हजारो हेक्टर पिकांवर ट्रॅक्टर फिरवावा लागला तरी होणार नाहीत पंचनामे

मनोज भिवगडे
Thursday, 27 August 2020

राज्यात तूर, मूग, उडीद पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. विषाणूजन्य रोग पडल्याने झालेल्या नुकसानीची मदत देण्यासाठी पंचनामे करताना अकोला जिल्ह्यात केवळ मूग पिकाच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले.

अकोला : राज्यात तूर, मूग, उडीद पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. विषाणूजन्य रोग पडल्याने झालेल्या नुकसानीची मदत देण्यासाठी पंचनामे करताना अकोला जिल्ह्यात केवळ मूग पिकाच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले.

शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक नुकसानभरपाई पासून वंचित ठेवण्यात येत असल्याने वंचित बहुजन आघाडी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यंदाच्या खरीप हंगामात उडीद, मूग पिकाचे विषाणूजन्य रोगामुळे नुकसान झाले. शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. हजारो हेक्टर मूग, उडीद पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागला. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी देखील पीक उपटून फेकण्याचा सल्ला दिला होता.

नैसर्गिक आपत्ती नुसार ३३ टक्के पेक्षा नुकसान झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते. कृषी आयुक्तालयाचे आदेशानुसार अकोला जिल्ह्यात जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांनी ता.२४ ऑगस्ट रोजी नुकसानीच्या पंचनांम्याचे आदेश काढले.

त्यामध्ये केवळ मूग पिकाचा पंचनामा करण्याचे आदेश आहेत. मूगा सोबतच उडीद पिकावर देखील विषाणूजन्य रोगाचा परिणाम झाला आहे. परंतु उडीद पिकाचा समावेश नुकसानीत केलेला नाही.

अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मूग आणि उडीद दोन्हीच्या सर्वेक्षणाचे आदेश काढले आहेत. अमरावती जिल्हा कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दोन्ही पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.

अकोल्यात मात्र केवळ मूग पिकाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. हा प्रकार म्हणजे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. दोन्ही पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ मिळवून द्यावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पातोडे यांनी दिला आहे.

नियमित कृषी अधीक्षक द्या!
अकोला जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासन अधिकारी म्हणून जबाबदारी असून, ते आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालकही आहेत. तीन पदावर एकच अधिकारी असल्याने त्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे लक्ष नाही. त्यामुळे कृषी खात्याने त्यांचे जागेवर नियमित जिल्हा कृषी अधीक्षक नेमावा, अशीही मागणीही वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Even if tractors have to be rotated on thousands of hectares of crops, there will be no panchnama