अधिकारी म्हणतात, आम्ही दिले; शेतकरी म्हणतात मिळालेच नाहीत!

Akola News Farmers did not get the pheromone trap of the agriculture department​
Akola News Farmers did not get the pheromone trap of the agriculture department​

अकोला : पिकांवरील गुलाबी बोंडअळी तसेच इतर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना मोफत कामगंध सापळे व ल्यूर वितरीत करण्यात येतात.

जिल्ह्यात सुद्धा तालुकानिहाय कामगंध सापळ्यांचे वितरण केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मात्र, शेतकरी म्हणतात, आम्हाला मिळालेच नाहीत. एवढेच नव्हे तर कृषी विभागाकडून वितरण होत असल्याची माहितीसुद्धा नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सन २०१७-१८ मध्ये गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादकांना उद्‍ध्वस्त केले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व इतर संस्थांनी गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी संशोधन व मार्गदर्शन, उपाययोजनेबाबत जगजागृती सुरू केली. फलीत म्हणून २०१८-१९ व २०१९-२० च्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी जाणवला. दोन वर्ष शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केल्यानंतर यावर्षी त्याकडे पाठ फिरवली. जनजागृती तर सोडाच, पण एवढेच नव्हे तर, किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाद्वारे तालुकानिहाय कामगंध सापळ्यांचे वितरण केले जात आहे, याची माहितीसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली नाही.
 
कामगंध सापळे व ल्यूरच्या गुणवत्तेवरही प्रश्‍नचिन्ह
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या टेंडर नार्मनुसार ट्रिपल कोटेड सिल्वर फिल्म पौचमध्ये एक ल्यूर व कामगंध सापळे असेब्लिंग करून एका बॉक्समध्ये १०० चे पॅकिंगद्वारे सप्लाय असायला पाहिजे. मात्र कृषी विभागाला असेब्लिंग न करता पोत्यात कामगंध सापळे व एका पौचमध्ये तीन ते चार ल्यूरचा सप्लाय होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कृषी विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या कामगंध सापळ्यांच्या व ल्यूरच्या गुणवत्तेबाबत सुद्धा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, त्याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.
 
काय म्हणतात शेतकरी
मी दोन एकरावर बीटी कपाशी लावली आहे. काही प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. कृषी विभागाने गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत कोणतीही उपाययोजना अजूनपर्यंत केली नसून, कामगंध सापळे देण्यात असल्याची माहिती मला व परिसरातील शेतकऱ्यांना नाही.
- घनश्याम चिलवंते, शेतकरी, कानशिवणी, तालुका अकोला

तेल्हारा व अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस पेरा असून, या भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक आहे. कृषी विभागाकडून अजूनपर्यंत कोणतेही उपाययोजना नाहीत.कामगंध सापळे सुद्धा दिलेले नाहीत. माझ्या मते शासनाकडून कामगंध सापळे वितरीत होत असल्याची माहिती सुद्धा शेतकऱ्यांना नाही.
- विलास ताथोड, शेतकरी, तळेगाव डवला, तालुका तेल्हारा
 
तालुक्यात शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचे वितरण कृषी विभागाकडून होत असल्याची अजूनपर्यंत माहिती नाही. कोणालाही वितरण झाल्याचे ऐकविण्यात नाही. सध्या काही प्रमाणात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे.
- गणेश नानोटे, शेतकरी, निंभारा, तालुका बार्शीटाकळी

कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे तालुकानिहाय कामगंध सापळे व ल्यूरचे वितरण केले आहे. तालुकास्तरावरून शेतकऱ्यांना त्यांचे वितरण होत आहे.
- मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com