शेतकऱ्यांनी वाचला जिल्हाधिकाऱ्यांसमोर नुकसानीचा पाढा

सुगत खाडे  
Tuesday, 8 September 2020

अकाेला ते खंडवा ब्रॉडगेज लोहमार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतून माती व गौणखनिजाचे वारेमाप उत्खनन करण्यात आल्याने शेत जमीनच खचली असून बळीराज्याला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देवून जिल्हाधिकारी पापळकर यांच्यासमोर नुकसानीचा पाढा वाचला.

अकोला : अकाेला ते खंडवा ब्रॉडगेज लोहमार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतून माती व गौणखनिजाचे वारेमाप उत्खनन करण्यात आल्याने शेत जमीनच खचली असून बळीराज्याला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देवून जिल्हाधिकारी पापळकर यांच्यासमोर नुकसानीचा पाढा वाचला.

त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना रितसर लेखी तक्रारी करण्याचे आवाहन केले. त्यासोबतच या प्रकरणी पुढील आठवड्यात महसूल, कृषी व रेल्व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकाेला-खंडवा ब्राॅडगेजसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी खाेदून माती उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र खाेदकाम करताना भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान हाेणार नाही, याची काेणतीही काळजी कंत्राटदार किंवा रेल्वे प्रशासनाने घेतली नसल्याचे रविवारी (ता. ६) शेतकरी जागर मंचाने काढलेल्या शेती नुकसान शाेध यात्रेतून उजेडात आले.

त्यामुळे शेतात कसे जावे, पीक कसे घ्यावे, शेतमालाची वाहतूक कशी करावी, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.

यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातीन नियोजन भवनात जिल्हाधिकारी पापळकर यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. शेती नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यावर जिल्हाधिकऱ्यांनी पुढील आठवड्यात रेल्व प्रशासनातील अधिकारी, कृषी अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेवून नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

शेताजवळ तलाव व नालेच तयार
ब्रॉडगेजसाठी उगवा, निंभाेरा, किनखेड, कराेडी, चाेहाेट्टा, करतखेड, कावसा, तराेळा, मराेडा, दनाेरी, देवळी परिसरातील शेतकऱ्यांची वारेमाप जमीन खाेदण्यात आली. परिणामी बाजूची इतर शेत जमीन खचत असून, खाेदलेल्या ठिकाणी तलाव व नालेच तयार झाले आहेत. ८० ते १०० फूट खाेलपर्यंत खाेदून माती बाहेर काढण्यात आली; परिणामी शेताजवळ तलाव-नालेच तयार झाले आहेत. यास्थितीमुळे शेती करणे सुद्धा कठीण झाल्याचा माहिती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Farmers report loss to District Collector