बेकायदेशीरपणे शाळेने केले शुल्क वसूल, अध्यक्ष, संचालक मंडळासह मुख्याध्यापिकेवर फुसवणूकीचा गुन्हा

विवेक मेतकर
Saturday, 22 August 2020

बेकायदेशीरपणे शुल्क वसूल केल्याप्रकरणी एमराॅल्ड हाईट्स स्कूलच्या (रिंग रोड, केशवनगर) मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या स्कूलला मान्यता स्टेट बोर्डाची असतानाही ती सीबीएससी बोर्डाची असल्याचे भासविण्यात आले होते. याबाबतची तक्रार अकाेला पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नाेंदवली.

अकोला  ः बेकायदेशीरपणे शुल्क वसूल केल्याप्रकरणी एमराॅल्ड हाईट्स स्कूलच्या (रिंग रोड, केशवनगर) मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या स्कूलला मान्यता स्टेट बोर्डाची असतानाही ती सीबीएससी बोर्डाची असल्याचे भासविण्यात आले होते. याबाबतची तक्रार अकाेला पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नाेंदवली.

काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने केशव नगरातील एमराल्ड हाईट्स स्कूलच्या प्राथमिक चाैकशी केली हाेती. याबाबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख व पालकांनी तक्रार केली हाेती. त्यानंतर या तक्रारीनुसार जि.प.च्या शिक्षण विभागाने प्राथमिक चाैकशीसाठी समिती स्थापन केली. या समितीने प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानंतर आता शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

गुन्हा दाखल होण्याची ही आहेत कारणे
केशव नगरातील एमराल्ड हाईट्स स्कूलच्या कारभाराची चाैकशी करण्यात आली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारी काही बाबींचा उहापाेह करण्यात आला. त्यामध्ये शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली व दुसरीसाठी अाॅनलाईन वर्ग घेता येत नाहीत. मात्र तरीही हे वर्ग अाॅनलाईन घेण्यात आले. इयत्ता तिसरी ते आठवीचे आॅनलाईन वर्ग नियाेिजत वेळेपेक्षा जास्त सुरू हाेते. असे करणे हे शासन नियमांचे उल्लंघन आहे. शिक्षक-पालक संघ कार्यकारी समितीची स्थापन झाली नाही. प्रभारी गटशिक्षणाधिकारी शाम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खदान पोलिस ठाण्यात एमराल्ड हाईट्स स्कूलच्या (केवश नगर,रिंग राेड) मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक मंडळािवरुद्ध भादविचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळा स्टेट बोर्डाची भासविली सीबीएससीची
एमराल्ड हाईट्स स्कूलला स्टेट बाेर्डाची मान्यता असतानाही सीबीएससी पॅर्टनवर आधारित खासगी प्रशासनाची पुस्तके, शाळेचा लाेगाे असलेल्या वह्या व गणवशाची विक्री शाळेतूनच हाेत असल्याचे दिसून येते, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. मान्यता स्टेट बाेर्डाची असतानाही ती सीबीएससी असल्याचे भासवून पालकांची दिशाभूल व विद्यार्थ्यांची फसवणूक केली. त्यानुषंगाने फी वसूल केली, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण राज्यमंत्र्यांनी म्हटले होते, पुढे काय झाले?
एमराल्ड हाईट्स स्कूलचा मुद्दा १४ आॅगस्ट राेजी शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतलेल्या आढवा बैठकीत निघाला हाेता. याबाबत पुढे काेणती कार्यवाही झाली, असा सवाल ना कडू यांनी उपस्थित केला हाेता. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यवाहीसाठी चाैकशी समिती गठित केली असल्याचे सांगितले. मात्र यापूर्वीच कारवाई हाेणे आवश्यक हाेते; ते का झाले नाही, असा सवाल करीत पालकमंत्री कडू यांनी नाराजी व्यक्त केली हाेती. त्यानंतर आता कारवाई झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News filed a case against Emerald Heights School