यंदा फटाके निघाले फुसकेच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

शहरातील फटाके विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत पण, ग्राहकच नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीपेक्षा अर्ध्यापेक्षा कमी व्यवसाय होत असल्याचे फटाका विक्रेते बबनराव सुरूशे यांनी सांगितले आहे.

रिसोड (जि.वाशीम):  शहरातील फटाके विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत पण, ग्राहकच नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीपेक्षा अर्ध्यापेक्षा कमी व्यवसाय होत असल्याचे फटाका विक्रेते बबनराव सुरूशे यांनी सांगितले आहे.

कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. फटाक्यांच्या धुरामुळे पुन्हा कोरोना वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यावर्षी शेतकरीही सुलतानी संकटात सापडला आहे.

यावर्षी दिवाळी या महत्त्वाच्या सणांमध्ये शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिवाळी सणाला सुरुवात झाली असली तरी, बाजारपेठेमध्ये दरवर्षी सारखी गर्दी जाणवत नाही. किराणा दुकाने वगळता इतर दुकानांमध्ये गर्दी दिसून आली नाही.

दिवाळी हा सण गरीब-श्रीमंत मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंतु, यावर्षी कोरोनाचे सावट व शेतकरी अडचणीत असल्यामुळे दिवाळी साध्या पद्धतीने साजरा होत आहे. पुजेचे साहित्य, मूर्त्यांची विक्रीही पाहिजे त्या प्रमाणात नाही. मोठ्या व किमती मुर्तिंना मागणी कमी आहे, असे मूर्ती विक्रेता गुजरे यांनी सांगितले. या सणाला फटाक्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. परंतु, यावर्षी फटाके बाजारात आज पर्यंत शुकशुकाट जाणवत होता.

आमचा हा व्यवसाय सिजनेबल आहे. यावर्षी कोरोनामुळे लग्न सराई झाली नाही. दिवाळीतही अर्ध्यापेक्षा कमी व्यवसाय होत आहे. अजून सहा महिने ते एक वर्ष हा माल काळजीपूर्वक सांभाळून ठेवावा लागणार आहे.
- बबनराव सुरुशे, फटाका विक्रेते, निजामपूर रिसोड

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Firecracker sales halved