बिनधास्त सुरू आहे वाहतूक, अपघात झाल्यास जबाबदार कोण?

रमेश कोंडाणे
Saturday, 5 September 2020

खडकपूर्णा नदीवरील पूल शिकस्त झाला. या पुलावरून पुढील सहा महिन्यांपर्यंत जड वाहनांना वाहतूक बंद करण्यात आली. तसे पत्र तत्कालीन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष सुमन चंद्रा यांनी ता. १० जुलै रोजी जारी केले होते. या पत्राकडे शासकीय यंत्रणेतील विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आजही या पुलावरून जड वाहतूक बिनधास्त सुरू आहे.

दुसरबीड (जि.बुलडाणा) : तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील पूल शिकस्त झाला. या पुलावरून पुढील सहा महिन्यांपर्यंत जड वाहनांना वाहतूक बंद करण्यात आली. तसे पत्र तत्कालीन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष सुमन चंद्रा यांनी ता. १० जुलै रोजी जारी केले होते. या पत्राकडे शासकीय यंत्रणेतील विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आजही या पुलावरून जड वाहतूक बिनधास्त सुरू आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष सुमन चंद्रा यांनी तालुक्यातील राहेरी नजीकचा पूल संरचनात्मक तपासणी दरम्यान कमकुवत झाल्याचे आढळून आल्याने पुढील सहा महिन्यांपर्यंत जड वाहनांना वाहतूक बंद करण्यात आल्याचे पत्र जारी केले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस यंत्रणा मिळून जालना तसेच सिंदखेडराजा व मेहकर येथून येणाऱ्या जड वाहनांना अनुक्रमे देऊळगाव राजा व चिखली मार्गाने वळवतील अशी अपेक्षा होती. या विभागांमध्ये आपसात समन्वय नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला खो देत वाहतूक आजही सुरू आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सूचना फलकाच लावले नाही
जड वाहनांची वाहतूक वळविण्यासाठी आवश्यक असलेले व ठळकपणे वाहन चालकांना दिसतील असे वाहतूक बंदीची सूचना देणारे फलक तयार करून ते या मार्गावर लावण्यात आले नाही. जालना, सिंदखेडराजा, मेहकर येथून जड वाहने प्रवेश करतात अशा ठिकाणी ते प्रदर्शित करणे अपेक्षित होते.

पोलिसांकडून तपासणी नाही
जालना व मेहकर येथील पोलिस यंत्रणेने या पुलावरून जाणारी वाहतूक थांबविण्यासाठी वळण मार्गाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून निगराणी करणे आवश्यक होते. तसे केलेले दिसून येत नाही. त्यामुळे जड वाहन चालकांना कुठलीही सूचना मिळत नसल्याने ते राहेरी पुलावरून मार्गक्रमण करीत आहे.
 
आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा
यामध्ये परिसरात पोलिस यंत्रणा व समृद्धी महामार्गावरील काही कर्मचारी हे चिरीमिरी करून जड वाहनांना जाण्यास परवानगी देत असल्याची चर्चा परिसरांमध्ये आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला सबंधित विभागाने हाय बॅरीकेटस उभे करायला हवे होते. ते न करता थातूर-मातूर बॅरीकेटस उभे केले आहे.
 
वाहनचालकांवर कारवाई नाही
या ठिकाणी तोडकी उपाय योजना केली आहे. ती जड वाहतूक करणाऱ्या चालकांनी तोडल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत अशा एकाही वाहनवर कारवाई झालेली नाही. पोलिसानी त्यांच्याकडे याबाबत अधीकार नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनच या ठिकाणी हतबल झाले.
 
अपघात झाल्यास जबाबदार कोण?
पुलावरून जड वाहतूक बंदचे आदेश असताना येथून दररोज हाजारो जड वाहनं ये-जा करीत आहेत. असे असेल तर पुलावरून जड वाहतुकीला बंदीचा आदेश काढलाच कशासाठी, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. हा शिकस्त पूल कोसळून आपघात घडल्यास त्याला जबादार कोण, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी यंत्रणांकडे त्याचे सध्यातरी कोणतेही उत्तर नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनधारकांनीच येथून जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.
 
हा पूल आमच्या विभागाकडे नव्यानेच हस्तांतरीत झाला आहे. या रोडवर व पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. यावर बँरीकेटस उभे केले होते. ते तोडण्यात येतात. त्यामुळे यावरून जड वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. लवकरात लवकर ती पूर्णपणे बंद करण्यात येईल.
- सुरेश कसबे, अभियंता, राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण, औरंगाबाद
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Heavy traffic continues from dangerous Raheri bridge