esakal | गड्या... बेभरवशाच्या नोकरीपेक्षा शेतीच बरी, उच्च शिक्षित तरूणाची शेतीकडे वाटचाल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Highly educated youth on their way to agriculture

कोरोनाने जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. महानगरात नोकरी करत असलेला नोकरदार घराकडे आला. घरी त्याला शेवटी शेतीनेच आधार दिला. उच्चशिक्षित असतानाही नोकरीची वाट न धरता आपल्या परंपरागत शेतीकडे लक्ष पुरवून अधिकाधिक उत्पादन मिळविण्याचे ध्येय समोर ठेवले.

गड्या... बेभरवशाच्या नोकरीपेक्षा शेतीच बरी, उच्च शिक्षित तरूणाची शेतीकडे वाटचाल

sakal_logo
By
गजानन देशमुख

शिरपूर जैन (जि.वाशीम) ः कोरोनाने जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. महानगरात नोकरी करत असलेला नोकरदार घराकडे आला. घरी त्याला शेवटी शेतीनेच आधार दिला. उच्चशिक्षित असतानाही नोकरीची वाट न धरता आपल्या परंपरागत शेतीकडे लक्ष पुरवून अधिकाधिक उत्पादन मिळविण्याचे ध्येय समोर ठेवले.

येथील जयंत इरतकर या उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने शेतीतून विविध पिके उत्तम प्रकारे घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या शेतातील पिके सध्या चांगल्या प्रकारे बहरत आहेत.


येथील युवा शेतकरी जयंत कुंडलीक इरतकर यांनी एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले. उच्च श्रेणीत उत्तीर्ण होऊन देखील नोकरीची वाट न पाहता शेतकरी पुत्र असल्याने स्वतःच्या परंपरागत शेतीत विविध पिके घेत आहेत. सोयाबीन, हळद, मिरची या पिकांचा त्यात समावेश आहे.

त्यांनी शेतात हळदीचे पीक घेतले असून, ते सध्या उत्तम आहे. शिरपूर ते रिसोड महामार्गालगत त्यांचे वडील कुंडलिक इरतकर यांची शेती आहे. या शेतीत जयंत यांनी मशागत करून जून महिन्यात दोन एकरात हळदीची लागवड केली.

सदर पीक हे पूर्णत्वास गेले नसले तरी हळदीची स्थिती उत्तम आहे. सरासरी सात ते आठ महिन्याचा कालावधी या पिकास लागतो. सध्या हे पीक जोमदारपणे वाढत आहे. त्यातून जास्तीत जास्त हळदीचे उत्पन्न मिळेल असा जयंत ईरतकर यांचा अंदाज आहे.

सोयाबीन पिकासह अन्य पिके ते घेत असल्याचे सांगतात. त्यात हळद व मिरची हे प्रमुख व मुख्य पीक असून, लागवडीपासून याकडे संपूर्णतः लक्ष देत असल्याचे ते सांगतात. त्यांचे घर शेतात असल्याने या पिकांकडे जातीने व वारंवार लक्ष पुरवता येते असे त्यांनी सांगितले. उच्च शिक्षण जरी घेतले असले तरी नोकरीच्या मागे न लागता, स्वतःच्या शेतीकडे वळून जयंत ईरतकर यांनी इतर युवा वर्गासमोर आदर्श ठेवला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)