esakal | जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगणात पेटविली सोयाबीनची होळी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Holi of soybeans lit in the yard of District Collector of Buldana district

मागील महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगणात पेटविली सोयाबीनची होळी

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम :  मागील महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, यंदाच्या समाधानकारक पर्जन्यमानामुळे शेती पीक चांगलीच बहरली होती. परंतु सप्टेंबर मधील अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

या नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या सोयाबीनची काढणी सुरू असताना परतीच्या पावसाने तांडव सुरू केले. त्यामुळे खरिप हंगामासाठीची शेती मशागत, खते, बी-बियाणे, निंदन, खुरपन तसेच सोंगणी व काढणीसाठी लागलेला खर्च देखील वसूल होण्याची शक्यता मावळली.

शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असताना प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानंतर जिल्ह्यातील खरिपाची नजर अंदाज पैसेवारी ६६ पैसे जाहीर केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर विमा कंपनीकडून परतावा मिळाला नाही तर, शासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीमुळे दुष्काळी मदतीपासून सुध्दा वंचित राहण्याची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटांचा डोंगर उभा झाला. शासन, प्रशासनाने जिल्ह्यातील पीक नुकसानीचे फेर सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तत्परतेने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होवू लागली आहे.

याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात एकत्र आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करून नुकसान भरपाईची मागणी केली. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.


आधीच कोरोना त्यात उत्पन्नात घट
गेल्या सात ते आठ महिन्यापासून कोरोनामुळे शेतीचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. भाजीपाला, दूध या वस्तूंना गिऱ्हाईकच नसल्याने शेतकऱ्यांना पिकलेला माल उकिरड्यावर टाकण्याची वेळ आली होती. खिशात दमडी नसताना व कर्जपुरवठा कर्जमुक्तीच्या जाचक अटीत अडकल्यावरही कर्ज काढून पेरणी केली गेली. आता उत्पादनखर्चही निघणे कठीण झाले. असे पीक हातात येत असल्याने शेतकरी गलितगात्र झाला आहे. प्रशासकिय पातळीवर या बाबीची गंभीरतेने दखल घेणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)