जागरची अभिनव दिवाळी; निराधारांचे पाय धुवून स्वागत, केसकर्तन, अभ्यंगस्नान अन् कपडे वाटप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

वेदना व जाणिवांचा जागर करत शेत बांधावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करून या कुटुंबांच्या चेहऱ्यावर जागर फाउंडेशनने हसू फुलवले. रद्दी संकलनातून निराधारांची दिवाळी हा उपक्रम जागर फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येतो.

तेल्हारा( जि.अकोला) ः संवेदना व जाणिवांचा जागर करत शेत बांधावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करून या कुटुंबांच्या चेहऱ्यावर जागर फाउंडेशनने हसू फुलवले. रद्दी संकलनातून निराधारांची दिवाळी हा उपक्रम जागर फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येतो.

 यंदाही या उपक्रमाला राज्यभरातून प्रतिसाद देत संवेदनशील लोकांनी मदत केली आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास १७ टनहून अधिक रद्दी संकलीत झाली आहे.

वसुबारस दिवाळीच्या पहिल्या दिवशी सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी खंडाळा शिवारातील शेतात बांधावर वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी भटकंती करणाऱ्या कुटुंबांसोबत जागर फाउंडेशनने दिवाळी साजरी केली.

या कुटुंबातील बालकांचे पाय धुवून स्वागत, केसकर्तन, अभ्यंगस्नान घालून नवे कोरे कपडे, ऊबदार स्वेटर, महिलांना साड्या व स्वच्छता विषयक साहित्य भेट देत, दिवाळी फराळ दिले.

त्यासह जेवण केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात परिसरातील गरजू कुटुंबातील व्यक्तींना साड्या १३०, स्वेटर ८०, मुलामुलींचे ड्रेस ३०, स्वच्छता विषयक साहित्याचे (मास्क, सॅनिटाझर, हँडवॉश साबण) वाटप करण्यात आले. यावेळी जागर फाऊंडेशनचे अकोला जिल्ह्यातील सदस्य सहभागी झाले. तसेच १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीजनिमित्त जिल्ह्यातील सात तालुक्यातील ७ गरजवंत महिलांना रद्दी विक्री करून आलेल्या रकमेतून दळणयंत्र वितरीत करण्यात येणार आहे.

जागर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे अनेक वंचित चेहऱ्यांवर हसू फुलविण्याचा प्रयत्न सार्थ ठरत आहे. सातत्याने समाजात समानता निर्माण करण्यासाठी जागर फाऊंडेशन उपक्रम राबवत असते. यासोबतच जल संवर्धन,स्वच्छता जाणीव जागृती साठी माझी वारी स्वच्छ वारी उपक्रम, आदिवासी निराधार घटकांना स्नेह, आपुलकीच्या आधारासह शिक्षण आरोग्य सुविधा पुरविण्याचा प्रयत्न सातत्याने समाज सहभागातून प्रामाणिकपणे सुरू असते म्हणून जनसामान्यांचे आपुलकीचे नाते जागर फाऊंडेशन सोबत जुळले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Jagar innovative Diwali; Welcome by washing the feet of the destitute, hair cutting, bathing and distribution of clothes