हॅलो, तुम्हाला 50 लाखांची लॉटरी लागली आहे!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

कौन बनेगा करोडपती हा अमीताब बच्चन होस्ट करीत असलेला एक प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम आहे. परंतु, केबीसीच्या नवावावर आता अनेक प्रॉड समोर येत आहेत.

अकोला:  ‘कौन बनेगा करोडपती हा अमीताब बच्चन होस्ट करीत असलेला एक प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम आहे. परंतु, केबीसीच्या नवावावर आता अनेक प्रॉड समोर येत आहेत.

कौन बनेगा करोडपती’च्या प्रशासकीय विभागातून बोलत असून तुम्ही ५० लाखांची रक्कम जिंकली आहे. ती आपल्या खात्यात जमा करायची आहे.

त्यासाठी बॅंक डिटेल्स द्या.’ असा व्हाईस मॅसेज सध्या अनेकांना येत आहे. पैशाच्या लालसेपोटी अनेक जण लगेच बॅंकेची माहिती शेअर करीत आहेत. हा सायबर गुन्हेगाराचा नवीन ट्रॅप आहे. यामध्ये अनेक जण अडकत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकताच नवीन फंडा उघडकीस आला असून, सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲपवर व्हाईस मॅसेज पाठवतात. त्यात कौन बनेगा करोडपतीच्या टीममधून बोलत असल्याचे दर्शवतात. मोबाईल क्रमांकामधून ‘लकी ड्रा’मध्ये आपल्या नंबरची निवड झाल्याची माहिती देतात.

लगेच ५० लाख रुपयांची रक्कम जिंकल्याची माहिती देतात व बॅंक डिटेल्स मागतात. हा फंडा वापरत असल्यामुळे अनेकांना तो मॅसेज खरा वाटतो. जे लोक या ट्रॅपमध्ये अडकतात ते लगेच वॉट्सॲपवर बॅंक पासबूक, एटीएम क्रमांक, पासवर्ड इत्यादी पुरवतात.

लगेच दुसरी टीम लागते कामाला
बॅंकेचे डिटेल्स येताच सायबर गुन्हेगारांची दुसरी टीम कामाला लागते. आपण बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून केबीसीचा चेक क्लिअर करण्यासंदर्भात बोलून भुरळ पाडतात. त्यांतर केबीसीने तुमच्या नावाचा चेक जमा केल्याचे सांगतात. बॅंक खात्याशी गोपनीय माहिती जसे की, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी आदी माहिती प्राप्त करून फसवणूक करीत आहेत. तसेच बँकेच्या नावे खोट्या लिंक, खोटे मेसेज पाठवून आदी वेगवेगळे स्क्रीन शेअरिंग ॲप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात येत आहे.

काय करावे
लॉटरी, लकी ड्रॉ, बक्षिसांच्या आमिषांकडे दुर्लक्ष करा
पैसे जिंकल्याचा मॅसेज येताच त्याची खात्री करा
फसव्या लिंक ओपन करू नका
आपला ओटीपी शेअर करू नका
नको ते ॲप्स इंस्टॉल करू नका
कॉलवर बॅंकेची डिटेल्स देऊ नका
वेळ पडल्यास थेट सायबर क्राईममध्ये तक्रार करा

खबरदारी घ्या
खबरदारी हाच उपाय आहे. लॉटरी किंवा पैसे जिंकल्याच्या आमिषाला बळी पडू नका. जर सायबर गुन्हेगाराने गंडविल्यास घाबरू नका. चोवीस तासांत थेट पोलिसात तक्रार करा. तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात येईल.
- केशव वाघ,
एपीआय, सायबर क्राईम विभाग

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: KBC fraud phone calls