esakal | ‘इडा पिडा टळो’ , २० वर्षापासून दिवाळीला ‘ते’ करतात लव्हाळीचे दिवे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: For the last 20 years, they have been making Diwali lights

आनंद, उत्साह, नवतेज, नवचैतन्य, सकारात्मकता आणि मांगल्याचे प्रतीक असणारी दीपावली कित्येक महिन्यांपासून कोरोनाच्या अंधकारमय सावटात आशेचा एक किरण घेवून आली.

‘इडा पिडा टळो’ , २० वर्षापासून दिवाळीला ‘ते’ करतात लव्हाळीचे दिवे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम  : आनंद, उत्साह, नवतेज, नवचैतन्य, सकारात्मकता आणि मांगल्याचे प्रतीक असणारी दीपावली कित्येक महिन्यांपासून कोरोनाच्या अंधकारमय सावटात आशेचा एक किरण घेवून आली.


दिवाळीच्या दिवशी दिवटी करून गाई-गोऱ्ह्यांना ओवाळले जाते. तालुक्यातील शेलगाव घुगे येथील शेतकरी भाऊराव धनगर हे दिवाळी निमित्त आजही या लव्हाळीचे दिवे बनवून शेजारी पाजारी वाटतात.


नदीकाठी वाढलेले लव्हाळे ‘ते’ कापून त्याची दिवटी केली जायची. (महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे वाचती, ती लव्हाळी) या लव्हाळीची केलेली दिवटी आणि त्या दिवटीत शेणाचा खड्डा केला जातो. त्यात तेल टाकायचे आणि दिवटीच्या उजेडात गाई-गोऱ्ह्यांना ओवाळले जाते. दररोज त्या दिवटीचे थर वाढत असतात.

म्हणजे पहिल्या दिवशी ती फक्त एकाच थराची, नंतर दररोज तीन-चार दिवसांत चढ्या क्रमाने ती दिवटी वाढत जाते. शेवटच्या दिवशी ही दिवटी चार थरांची. ‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ असे म्हणत गोठ्यातल्या जनावरांना ओवाळले जाते.


अत्यंत कलाकुसरीचे असणारे हे काम करण्यासाठी भल्या पहाटे शेतात जावून लव्हाळी गवत आणून भाऊराव गेल्या २० वर्षापासून लव्हाळीचे हे दिवे आजही मोठ्या उत्साहाने बनवतात विशेष म्हणजे दिवाळीला सकाळपासूनच गावकरी भाऊराव यांच्या घराकडे लव्हाळ्यापासून दिवट्या बनवून घेण्यासाठी गर्दी करतात.

पूर्वी भाऊबिजेला शेतकरी भावांना ओवाळताना खेड्यापाड्यातील महिला ‘इडा पिडा टळो, बळी राजाचं राज्य येवो’ अशी पारंपारिक ओवाळणी घालून भावाला आशीर्वाद द्यायचा. एका अर्थाने हे मातीत राबणाऱ्यांचे पसायदान. सर्वाचे भले होवो, संकटे जावोत, आपत्ती नष्ट होवो अशा प्रकारची भावना भाऊबिजेला ओवाळताना व्यक्त केली जायची.

त्यात लव्हाळी गवतापासून बनवलेला हा नैसर्गिक दिवा (दिवटी) कृषी प्रधान संस्कृतीचे द्योतक ठरतो. दिवाळी दरवर्षीच येते आणि ही दिवाळी साजरी करण्याची रीतही प्रत्येकाची वेगवेगळी. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ अशी आपली आदर्श संस्कृती जतन व्हावी म्हणून आधुनिक युगातील पिढीला ह्या पारंपारिक गोष्टीचे महत्त्वही भाऊराव धनगर पटवून सांगतात.

(संपादन - विवेक मेतकर)