महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी मागितली इच्छामरणाची परवानगी

अरूण जैन 
Tuesday, 8 September 2020

महावितरणच्या बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ व इतर रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या युवकांनी आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा इच्छा मरणाला परवानगी द्यावी, अशी मागणी करून महावितरण विरोधात निदर्शने केली.

बुलडाणा  : महावितरणच्या बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ व इतर रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या युवकांनी आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा इच्छा मरणाला परवानगी द्यावी, अशी मागणी करून महावितरण विरोधात निदर्शने केली.

वीज कंत्राटी कामगार कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महावितरण कंपनीमध्ये नियमित रिक्त पदांच्या जागेवर गेले अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने शेकडो कामगार काम करत आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत. या संदर्भात त्यांनी वारंवार शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. आंदोलने केली,

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. सात व आठ जुलै रोजी राज्यातील हजारो वीज कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. ऊर्जा मंत्र्यांनी लवकरच त्यांची बैठक घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन अद्यापही न पाळल्याने कंत्राटी कामगारांमध्ये तीव्र नाराजी व संताप आहे.

त्यामुळे आम्हाला एक तर इच्छामरणाची परवानगी द्या किंवा आमच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा, अशी विनंती या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी सोमवार, ता.७ पासून महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येणार असून, मुंबईत आझाद मैदानात सुद्धा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. इच्छामरणाची परवानगी मिळेपर्यंत किंवा आमची समस्या निकाली निघेपर्यंत आम्ही घरी जाणार नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News MSEDCL contract workers seek permission for euthanasia