युवकाच्या घरात जुनी घातक शस्त्रे, बाळापूर शहरातून पाच तलवारी जप्त  

अनिल दंदी
Friday, 9 October 2020

शहरातील गुलशन कॉलनी व आबाद नगरातून पाच तलवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत. 

बाळापूर (जि.अकोला): शहरातील गुलशन कॉलनी व आबाद नगरातून पाच तलवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत. 

या प्रकरणी दोन युवकांवर बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तलवारी का खरेदी केल्या, याचा तपास सुरू झाला आहे.

शहरातील गुलशन कॉलनी येथील मो. अनिस गुलाम हारुन (२७) या युवकाच्या घरात जुनी घातक शस्त्रे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी काल बुधवारी रात्री उशिरा सदर युवकाच्या घरी जाऊन झाडाझडती घेतली असता घातक शस्त्र दोन जुन्या तलवारी पोलिसांना मिळून आल्या.

या तलवारींची किंमत दोन हजार रुपये एवढी आहे. पोलिसांची कारवाई सुरू असतानाच आणखी एका जणाच्या घरात शस्त्रे असल्याची माहिती भ्रमणध्वनीवर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून शहरातील आबाद नगर येथील रहिवासी व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शाकिर खान व त्याचे वडील जाकीर खान चांद खान यांचे राहत्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता तीन नवीन तलवारी मिळून आल्या.

या तलवारींची किंमत ६ हजार रुपये एवढी आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी शाकिर खान हा पळून गेला असून त्याचे वडील जाकीर खान न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांवर बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही मोहीम अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक जि.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर हटवार,मजीद यांचे सह आदींनी केली

संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Old deadly weapons, five swords seized from Balapur city