शिक्षकांनो, बदली पाहिजे तर विनंती करा! प्रशासकीय बदल्या स्थगित, केवळ १५० शिक्षकांच्याच होणार बदल्या

सुगत खाडे  
Friday, 7 August 2020

कोविड-१९ चा प्रादुर्भाव विचार घेता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत प्रशासकीय बदल्या स्थगित करण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अकोला  ः कोविड-१९ चा प्रादुर्भाव विचार घेता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत प्रशासकीय बदल्या स्थगित करण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या केवळ विनंती बदल्या होणार आहेत. सदर बदल्यांसाठी सर्व संवर्गातील केवळ १५० शिक्षकच पात्र असल्याने त्यांच्यासाठीच बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येईल.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सन् २०२०-२१ या वित्तीय वर्षात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या करण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले होते. सदर बदल्या १५ टक्क्यांच्या मर्यादेत करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या.

त्यामुळे बदल्यांसाठी पात्र शिक्षकांची संवर्गनिहाय यादी तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले. सदर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच ग्रामविकास विभागाने ५ आॅगस्टरोजी नव्याने आदेश जारी करुन यावर्षी शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत विनंती बदल्याच करण्याच्या सूचना केल्या आहेत,

तर प्रशासकीय बदल्या न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाअंतर्गत कार्यरत केवळ १५० पात्र शिक्षकांच्याच विनंतीवर बदल्या करण्यात येतील. सदर बदल्या ह्या १५ टक्के प्रमाणाच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजेच ७.५ टक्केतच होणार आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Only 150 teachers to be transferred, administrative transfers postponed; The request will be exchanged