हॅलो....बेड मिळेल का बेड? रुग्णांचे नातेवाईकच लागले बेड शोधायला

दीपक पवार
Tuesday, 15 September 2020

आजमितीला कोरोनाची भीती जरी नागरिकांमध्ये नसली तरी, लक्षणे विचित्र वाटल्यास जीवित्वाच्या आकांतापायी नागरिकांच्या तंबूत घबराहट निर्माण होत असून, काही प्रमाणात नागरिक स्वतः होऊन अँटीजेन टेस्टला सामोरे जात आहेत. त्यामुळे, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसांगणिक वाढतच आहे.

कारंजा - लाड (जि.वाशीम) : अनलॉक प्रक्रिया तसेच अँटीजेन टेस्ट अंमलात आल्याने कारंजा तालुक्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा आलेख वाढताच आहे. त्यामुळे बाधितांच्या लक्षणावरून किंवा बेडच्या उपलब्धतेनुसार काहींवर तालुका पातळीवरच उपचार केल्या जाते. मात्र, काहींना इतरत्र रवाना करण्यात आल्यास नातेवाईकांनीच बेड खाली आहे की, नाही याची माहिती गोळा करा, असे फर्मान स्थानिक रूग्णालय सोडत आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांची तारांबळ उडून मोबाईलवरून हॅलो....बेड मिळेल का बेड? अशी आर्तहाक नातेवाईकांकडून दिली जात आहे.

आजमितीला कोरोनाची भीती जरी नागरिकांमध्ये नसली तरी, लक्षणे विचित्र वाटल्यास जीवित्वाच्या आकांतापायी नागरिकांच्या तंबूत घबराहट निर्माण होत असून, काही प्रमाणात नागरिक स्वतः होऊन अँटीजेन टेस्टला सामोरे जात आहेत. त्यामुळे, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसांगणिक वाढतच आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अशातच या रुग्णांच्या उपचारासाठी बेड उपलब्ध होणे आवश्यक असताना मात्र, काही प्रशासकिय अडचणी यास आडकाठी ठरत आहेत. बेडची इतंभूत माहिती नातेवाईकांना मिळत नसल्याने प्रशासनाने स्थानिक पातळीवर बेडची सूत्रे हाती घेऊन, तालुका व जिल्हा पातळीवर कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याकरिता तसेच त्याची माहिती नातेवाईकांपर्यंत पोहचविण्याकरिता सनियंत्रण कक्षाची स्थापना करावी.

जेणेकरून कोरोना प्रतिबंध-उपचार व रुग्णालय बेड अलोकेशन मॅनेजमेंटची २४ तास माहिती रुग्णांचे नातेवाईक, कुटुंबिय, परिजन यांना या कक्षाच्या माध्यमातून मिळेल. यासोबतच, बेडची उपलब्धता, वाटप व इतर पुरक सुविधासंबंधी मदतीचे संवाहनाकरिता सुद्धा साहाय्य ठरेल, अशी चर्चा वजा मागणी कारंजा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

कोरोना अलर्ट प्रमाणे रोजच मिळावी बेडची माहिती
कारंजा तालुक्यासह जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये बेड मिळवणे आजमितीला फार कठीण झाले आहे. सध्या कोणत्या कोविड सेंटर, शासकिय रुग्णालयात किती बेड खाली आहेत किंवा बेड खाली नाहीत याची माहिती रुग्ण हॉस्पिटलला नेइस्तोवर मिळत नाही. तालुका ठिकाणावरून रुग्ण जिल्हा ठिकाणच्या हॉस्पिटलला घेऊन गेल्यावरच त्यांना तेथे बेड नसल्याचे सांगितले जात असल्याने काही जण अकोला-अमरावतीची वाट धरतात. मात्र, जिल्हा ठिकाणी जाण्याचा वेळ व्यर्थ जात असल्याने रुग्णाच्या जीवित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शिवाय, सर्वांना त्याची माहिती मोबाईलवरच मिळाली तर, रुग्णाला घेऊन विविध हॉस्पिटलचे उंबरठे झिजविण्याची वेळ नातेवाईकांवर येणार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे, कोरोना अलर्टचा संदेश व्हायरल होतो. त्याचप्रमाणे बेडची माहिती मिळण्याची व्यवस्था प्रशासनाने करण्याची गरज असल्याचे कारंजा तालुक्यातील रहिवासीयांमधून बोलल्या जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Relatives of patients started searching for beds