
येत्या काही दिवसात दिवाळी हा सर्वात मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित राहवे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दिवाळी आली की नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुढे करीत या कारवाया सुरू केल्या जातात.
अकोला ः वर्षभर इतर वेळी जणू काही भेसळ होतच नाही आणि दिवाळी आली की भेसळ करण्याचा गोरखधंदा सुरू होतो, असा अर्विभावात या कारवाया केल्या जात असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न चिन्ही उपस्थित केले जात आहे.
दिवाळीची चाहूल लागतात अन्न व औषध प्रशासन विभाग खळबळून जागा होतो. अन्नपदार्थांत होणारी भेसळ रोखण्यासाठी या विभागाच्या कारवाया सुरू होतात. अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी जठरपेठ स्थित केला प्लॉट येथील एका दुकानात वैभव गणेश मोडक यांच्या घरी भेसळ युक्त खाद्यपदार्थांचा माल असल्याच्या माहितीवरून कारवाई केली.
या कारवाईत खाद्य पदार्थाच्या पाकिटांवर कुठलेही लेबल नसल्याने तसेच या मालाचे खरेदी बिल नसल्याने व त्यावर बेस्ट बिफोर तारखेचा उल्लेख नसल्याने ती कमी दर्जाच्या असल्याचे दर्शवून कारवाई केली. ही तत्परता मात्र या विभागाकडून वर्षभर दाखविली जात नाही.
वर्षभर नियमित तपासणीच नाही
दिवाळी सण आला की व्यावसायिकांना वेठीस धरून सुरू होणाऱ्या कारवाईत गुंतलेले अधिकारी वर्षभर त्यांच्या कर्तव्याची आठवण ठेवत नाही. अधिकाऱ्यांकडून कोणते हितसंबध वर्षभर जोपासले जातात त्यामुळे कुठेही नियमित तपासणी होत नाही. ना हॉटेल, ना किराणा दुकानांमधील खाद्य पदार्थांची तपासणी. नियमित तपासणी होत नसल्याने भेसळ करणाऱ्यांचे फावते. दिवाळीत हा खोरखधंदा जोमाने सुरू होतो. दिवाळीच्या सुरुवातीला एखादी छोटी कारवाई करून पुढे ‘गणित’ हा विभागाकडून सरळ करून घेतले जात असल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे.
(संपादन - विवेक मेतकर)