शाळा बंद; विद्यार्थी वेचतायेत कापूस, भीती श्वसनाच्या आजारात वाढ होण्याची

सदानंद खारोडे
Monday, 19 October 2020

हवामानात झालेला एकदम बदल, शेतीची तोंडावर आलेली कामे व मजुरांचा तुटवडा लक्षात घेता ग्रामीण भागातील शेतीवर विसंबून असणाऱ्या कुटुंबातील सर्वच जन शेतीच्या कामासाठी प्राधान्य देत असून विशेषता वेचणीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे.

तेल्हारा (जि.अकोला) :  कोविड महामारी च्या काळामध्ये राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्था बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी कापूस वेचणी कडे वळल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे.

हवामानात झालेला एकदम बदल, शेतीची तोंडावर आलेली कामे व मजुरांचा तुटवडा लक्षात घेता ग्रामीण भागातील शेतीवर विसंबून असणाऱ्या कुटुंबातील सर्वच जन शेतीच्या कामासाठी प्राधान्य देत असून विशेषता वेचणीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे.

वाढती महागाई, शेतमजुरीच्या दरांमध्ये झालेली वाढ व शेतमालाचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची परिपूर्ती व्हावी म्हणून शेतकरी कुटुंबातील सर्व लहान थोर शेती कामाला प्राधान्य देत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याने घरातच रहावे लागत आहे.

अशा परिस्थितीत लेकरांचा घरी सांभाळ करण्यासाठी कुणाला ठेवण्यापेक्षा लेकरांचा कापूस वेचणी साठी सहभाग घेतल्या जात आहे. शेतीकामात बाल वयातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असला तरी ग्रामीण भागात कपाशीचे बीटी बियाणे लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

या कपाशीच्या संपर्कात जर लहान मुले आली तर त्वचा रोगासह श्वसनाच्या आजारांनी ही बालके ग्रस्त होतील.अशी भीती व्यक्त केल्या जात आहे. शेतीच्या कामामध्ये लहान बालके आनंदाने सहभाग घेत असले तरी कोरोना महामारीचा काळ पाहता आरोग्यविषयक सवयींचे पालन करणे गरजेचे आहे.

कापूस वेचताना बारीक तंतू नाकाद्वारे श्‍वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी कापूस वेचणी करू नये. घरीच शालेय पुस्तक वाचन करून अभ्यास करावा.
- तुलसीदास खिरोडकार, बालरक्षक तेल्हारा

शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून शेती कामासाठी जाऊ नये व पालकांनी सुद्धा नेऊ नये कापूस वेचणी करताना चामडीचे आजार व डोळ्यांना ईजा होण्याची शक्यता असते.
-डॉ. ज्ञानेश्वर तराळे, बालरोग तज्ज्ञ, तेल्हारा

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: School closed; Students sell cotton, fear of respiratory illness