
मागील तीन वर्षांपासून मंजूर गुंठेवारी प्लॉट धारकांच्या घरकुलाचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेत आंदोलन करीत गोंधळ जागरण केले. शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
अकोला : मागील तीन वर्षांपासून मंजूर गुंठेवारी प्लॉट धारकांच्या घरकुलाचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेत आंदोलन करीत गोंधळ जागरण केले. शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजुर झालेल्या घरकुलांमध्ये २५०० घरकुले गुंठेवारी प्लॉट आहेत. तर ८८८ प्लॉट गावठाण मधील आहेत. यापैकी गुंठेवारीचे प्लॉट असलेल्या लाभार्थ्यांची घरकुले तीन वर्षापूर्वी मंजुर झाली आहेत.
हे प्लॉट ले-आऊट नसल्याने गुंठेवारी नियमानुकुल केल्या जात नाही, तोपर्यंत मनपा कार्यालयात आयुक्तांच्या दालनापुढे ठिय्या देत गोंधळ जागरणाचा कार्यक्रम सुरूच ठेवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला.
यापूर्वी २७ ऑक्टोबर याच मागणीसाठी ठिय्या आंदोलन करीत आयुक्तच्या रिकाम्या खुर्चीला हार घालण्यात आला होता. या आंदोलनात राजेश मिश्रा आणि शिवसेनेचे मंजुषा शेळके, गजानन चव्हाण, अनिता मिश्रा, प्रमिला गिते, सपना नवले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. दुपारी एक वाजता आयुक्तांच्या दालनात पोचले.
५०० लाभार्थ्यानाही लाभ नाही
गुंठेवारी प्लॉट धारकांची २५०० घरकुले मंजुर आहेत. यात ५०० लाभार्थ्यांनी २००१ पूर्वी गुंठेवारीचा प्लॉट खरेदी केलेला आहे. नियमानुसार या लाभ धारकांना आवास योजनेचा लाभ देता येणे शक्य आहे. मात्र महापालिकेने या लाभार्थ्यासह सर्वच लाभार्थ्यांचे घरकुलांची कामे सुरू केली नाहीत.
मनपात जबाबदार अधिकाऱ्यांची अनुपस्थिती
महानगरपालिकेत शिवसेनेचे आंदोलन सुरू असताना मनपा आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत अजय गुजर यांनी आंदोलकांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र किमान काही फाईल तरी जोपर्यंत पूर्ण करून लाभार्थ्यांना दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.
(संपादन - विवेक मेतकर)