हत्येचा संशय; सरपंचाच्या मुलीचा औरंगाबाद येथे मृत्यू

दीपक पवार
Friday, 9 October 2020

तालुक्यातील मनभा गावातील सरपंचांच्या गर्भवती मुलीची औरंगाबाद येथील सासरच्या मंडळींनी गळा आवळून खून केल्याचा आरोप माहेरच्यांकडून करण्यात आला आहे.

कारंजा -लाड (जि.वाशीम) ः तालुक्यातील मनभा गावातील सरपंचांच्या गर्भवती मुलीची औरंगाबाद येथील सासरच्या मंडळींनी गळा आवळून खून केल्याचा आरोप माहेरच्यांकडून करण्यात आला आहे.

अशातच सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा माहेरच्या मंडळींनी घेतला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्ती करून त्यांना मृतदेह सुपूर्द केला.

दरम्यान ४२ तासानंतर त्या विवाहितेवर शोकाकुल वातावरणात मनभा येथे अंतीमसंस्कार करण्यात आला. औरंगाबाद येथील बीड बायपास परिसरातील अबरार कॉलनीमधील रहिवासी असलेल्या गर्भवतीचा रविवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माहेरच्या मंडळींनी आक्रोश करीत सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काही काळ मृतदेह घाटी रुग्णालयात पडून होता.

कुलसूम अनिसोद्दीन सिद्दीक्की (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रविवारी रात्री ७.३० वाजताचया सुमारास कुलसुमला सासरच्या मंडळींनी बेशुद्धावस्थेत बीड बायपासवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले.

घटनेची माहिती तिच्या माहेरकडील नातेवाईकांना मिळताच सोमवारी सकाळी ते औरंगाबादेत दाखल झाले. कुलसुमचा मृतदेह पाहून सासरच्या मंडळींनी तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप पोलिसांकडे केला. खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.

गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिस निरीक्षक सरेंट माळाळे यांनी नातेवाईकांची समजूत काढून मयत महिलेचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सातारा ठाण्यात याविषयी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान सायंकाळी पोलिसांना कुलसुम यांचा शवविछेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालात मृतक कुलसुमच्या मानेवर जखमेच्या खुणा दिसून आल्या असून, मयताचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक मारोती दासरे यांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली असून, दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Suspicion of murder; Sarpanchs daughter dies at Aurangabad