अनलॉक 5 : आता रात्री  नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार बाजारपेठ, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, भोजनालय होणार सुरू

सुगत खाडे  
Friday, 2 October 2020

 पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक (गाईडलाईन्स) सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सुद्धा सदर मार्गदर्शक सूचनांचे पालन करत जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे.

अकोला : पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक (गाईडलाईन्स) सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सुद्धा सदर मार्गदर्शक सूचनांचे पालन करत जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे.

त्याअंतर्गत आता बाजारपेठेतील दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यासह हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व भोजनालय येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू होतील. त्यामुळे अनलॉक ५ नागरिकांना रात्री ९ वाजेपर्यंत बाजारपेठेत खरेदी करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरूवारी (ता. १) रात्री उशीरा जारी केले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात २३ मार्चपासून संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्याअंतर्गत विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यान आता टाळेबंदीचे शिथिलीकरण करण्यात येत असून राज्य व केंद्र सरकार टप्प्या-टप्प्याने सेवासुविधांवर लावलेले निर्बंध कमी करत आहे.

दरम्यान ३० सप्टेंबर रोजी राज्य शासनाने अनलॉक ५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामध्ये येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरू करण्यास शासनाने मुभा दिली आहे. जिल्हा प्रशासनाने सुद्धा सदर आदेश जिल्ह्यासाठी कायम ठेवला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व भोजनालय येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू होतील. यासह प्रशासनाने रात्री ७ नंतरची संचारबंदी शिथिल केली आहे. त्यामुळे आता व्यापारी बाजारपेठेतील दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवू शकतील. परंतु त्यानंतर मात्र सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी कायम राहिल. शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क मात्र बंदच राहतील.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Unlock 5: Markets, hotels, restaurants, restaurants will be open till 9 pm now