
अकोला शहरातही इतिहासाचा एक चिरंतन ठेवा आहे. ही अशी शिदोरी आहे की जी वर्षानुवर्षे स्वातंत्र्य चळवळीच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे.
अकोल्याच्या गल्ली बोळांत आढळली इतिहासातील सोनेरी पानं!
अकोला: अकोला शहरातही इतिहासाचा एक चिरंतन ठेवा आहे. ही अशी शिदोरी आहे की जी वर्षानुवर्षे स्वातंत्र्य चळवळीच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे.
अकोल्याची स्वातंत्र्य चळवळ अजूनही आजच्या तरूणाईपर्यंत पोहचत नाही. स्वातंत्र्य चळवळ म्हणजे फक्त लष्करी कायदा एवढेच मर्यादित प्रतिबिंब आजपर्यंत जनमानसात उमटलेले होते. परंतु एवढीच या शहराची ओळख नाही, तर त्या प्रतिबिंबावर असे किती तरी सोनेरी दवबिंदू आहेत की जे अज्ञात राहिले होते.
कोणासही त्यांचे अस्तित्वसुद्धा माहीत नव्हते. अशा सोनेरी दवबिंदुंना समाजासमोर आणण्याचे आणण्यासाठी काही लोक शहरात येतात. शहरातील वेगवेगळ्या इमारती, वाचनालये, व्यक्तींना भेटतात. पुस्तकांचा धांडोळा घेत अज्ञात इतिहासाचा मागोवा घेण्याची धडपड त्यांच्या काल झालेल्या दौऱ्यातून दिसून आली.
निमित्त होते ते क्रांतीकारक राजगुरू यांच्या अकोल्यातील वास्तव्याचे. राजगुरुंचे नातू विलास प्रभाकर राजगूरू त्यांच्या पाच जणांच्या टीमसह रविवारी (ता.29) शहरात दाखल झाले. अन् सुरू झाला शोध त्या वास्तू, ठिकाणं आणि व्यक्तींचा ज्यांच्या ज्यांच्या संम्पर्कांने राजगुरूंच्या क्रांतीला अकोल्यातून पाठबळ मिळालं.
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शहीद भगतसिंह यांच्याबरोबर फासावर गेलेले क्रांतिवीर राजगुरू यांच्या शिवराम हरी जीवनावर राजगुरू आधारित 'हुतात्मा शिवराम राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा' ही मराठी वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीस येत आहे.
स्वातंत्र्ययुद्धात ज्या क्रांतिकारकांनी जिवावर उदार होऊन महान कार्य केले त्यामध्ये शिवराम राजगुरू यांचे नाव अग्रस्थानी आहे. सध्याच्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख होण्याच्या उद्देशाने ओटीटी व्यासपीठाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक दस्तावेज वेबसिरीजच्या माध्यमातून लवकरच आपल्या भेटीस येत आहे.
ही वेबसिरीज म्हणजे स्वातंत्र्यचळवळीत ज्या क्रांतिकारकांनी अनन्वित अत्याचार सहन करून हसत हसत बलिदान केले त्यांना आदरांजली अर्पण करणारी आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड (आताचे राजगुरुनगर) येथे जन्मलेले शिवराम हरी राजगुरू क्रांतिकारक कसे झाले, याची कहाणी यात दाखवण्यात येणार आहे. या वेबसिरीजचे लेखन आशिष निनगुरकर करणार असून मूळ कल्पना विलास राजगुरू यांची असल्याची माहिती क्रिएटिव्ह दिग्दर्शक सिद्धेश राजगुरू यांनी दिली.
अनेक क्रांतिकारांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असून त्याचे मोजमाप आपण करू शकत नाही. म्हणून या त्यांच्या विचारांचा मागोवा घेऊन वाटचाल करणे हीच या त्रिमूर्तीना खरे अभिवादन ठरेल, अशा आशावाद यांचे नातू विलास राजगूरू यांनी व्यक्त केला.
त्यांच्यासोबत काव्या ड्रीम मुव्हीज टीम सहभागी झाली होती. "राजगुरू" वेबसरीज- पाच भाषेत- मराठी, हिंदी,तमिळ, पंजाबी,तेलग भाषेत तयार होणार आहे. याची मूळ संकल्पना-विलास राजगुरू यांची असून लेखक- आशिष निनगुरकर आहेत तर कार्यकारी निर्माते-प्रतिश सोनवणे, कलावंत- प्रदीप कडू, प्रॉडक्शन मॅनेजर-सुनील जाधव, कॅमेरामन- सिद्धेश दळवी आदींनीही या स्थळांना भेटी दिल्यात.
अकोल्यातील चिरंतन ठेवा
शहरातील बाबूजी देशमुख वाचनालयातील राजगूरूंनी वाचन केलेली जागा आणि समोरच्या गॅलरीतून फिरताना कोतवालीवर ठेवल्या जाणारी पाळत, याविषयी त्यांनी माहिती घेतली. राज-राजेश्वर मंदीर परिसरातील साठे यांचा तेव्हाचा वाडा ज्यात राजगुरू स्वतः मुक्कामी होते. सावजी यांचे घर जेथे राजगूरूंनी रात्रभर झोपून सकाळी पुण्याला रवाना झाले होते.
इतिहासाचा धांडोळा
या सर्व वास्तूंचा धांडोळा घेत ही टीम शहरातील इतिहास तज्ज्ञ, मार्गदर्शक आणि पुस्तकांचा मागोवा घेत होते. यात विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचे मोलाचे सहकार्य तर त्यांना लाभलेच. यासह त्यांच्या संशोधनासाठी शक्यती मदत करण्याची तयारी दर्शविली.
राजगुरूंचा जाज्वल्य इतिहास जनतेसमोर यावा यासाठी ते प्रयत्न करीत असलेली टीम पुढे अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडे रवाना झाली.
(संपादन - विवेक मेतकर)