पक्षांतराचे वारे जोमात, एकाच कुटुंबात वेगवेगळे झेंडे, भाऊबंदकीवर राजकारण पडतेय भारी!

शाहीद कुरेशी
Wednesday, 9 September 2020

नगरपंचायतीची निवडणूक उंबरठ्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोमात असून, काही लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते आपल्या पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या घेत आहेत. विशेष म्हणजे, अनेकांच्या भाऊबंदकीतील लोकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश घेतल्याने पक्षांतराचे राजकारण भाऊबंदकीवर भारी पडल्याचे दिसत आहे.

मोताळा (जि.बुलडाणा) : नगरपंचायतीची निवडणूक उंबरठ्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोमात असून, काही लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते आपल्या पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या घेत आहेत. विशेष म्हणजे, अनेकांच्या भाऊबंदकीतील लोकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश घेतल्याने पक्षांतराचे राजकारण भाऊबंदकीवर भारी पडल्याचे दिसत आहे.

मागील पाच वर्षांपासून येथील नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. दरम्यान, मोताळा नगरपंचायतीचा गढ कायम राखण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस जोमाने भिडणार आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तर, बुलडाणा विधानसभा मतदारसंघा प्रमाणेच मोताळा नगर पंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शिवसेना ही निवडणुकीचा रणसंग्राम गाजविण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर मोताळा शहरात राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, पक्षांतराला वेग आला आहे. काही लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते पक्षनिष्ठा बाजूला ठेवून दुसऱ्या पक्षात कोलांट उडी घेत आहेत. अर्थात या पक्षांतराच्या पाठीमागे वेगवेगळी कारणे आहेत.

दोन वाहतून पोलिसांनी घेतली 50 रुपयांची लाच, अॅन्टी करप्शनच्या पथकाने रचला सापळा, मग पहा काय झाले

मात्र या राजकीय घडामोडी चर्चेच्या ठरत आहेत. पक्ष प्रवेशाच्या या राजकारणात शिवसेना व काँग्रेसमध्ये कमालीची चुरस दिसत आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये सुद्धा इनकमिंग सुरू झाली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस सध्या संयमाची भूमिकेत दिसत आहे. एकंदरीत मोताळा नगर पंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे. मात्र पक्षांतराच्या राजकीय घडामोडीत अनेकांची भाऊबंदकी वेगवेगळ्या पक्षात दिसत आहेत.

एकाच कुटुंबात वेगवेगळे झेंडे दिसत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या रणसंग्रामात पक्षनिष्ठा जोपासल्या जाईन की नातेसंबंध, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

सर्वसामान्यांना विकासाची अपेक्षा
मागील पाच वर्षांच्या काळात मोताळा शहरात बरीच विकासकामे झाली असली तरी अनेक समस्या सुद्धा कायम आहेत. आता नगर पंचायतीची निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र सर्वसामान्यांना राजकारणाच्या चर्चांमध्ये रस नसून, शहराच्या विकासाची अपेक्षा आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The winds of change are blowing, different flags are flying in the same family, politics is falling heavily on brotherhood!