esakal | कुख्यात रस्त्यांमुळे महिलेचा मृत्यू, लोकप्रतिनिधिंच्या चुप्पीने चर्चेला उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Woman death due to infamous roads, silence of peoples representatives sparks discussion

 अकोला जिल्ह्यातील अनेक रस्ते लागोपाठ मृत्यूला कारणीभूत ठरत असून, हे रस्ते आपल्या खराब दर्जाने कुख्यात ठरत आहेत. हिवरखेड-तेल्हारा हा रस्त्याही याच कुख्यात मार्गापैकी एक. या रस्त्याने हिवरखेडच्या एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कुख्यात रस्त्यांमुळे महिलेचा मृत्यू, लोकप्रतिनिधिंच्या चुप्पीने चर्चेला उधाण

sakal_logo
By
धीरज बजाज

हिवरखेड (जि.अकोला) :  अकोला जिल्ह्यातील अनेक रस्ते लागोपाठ मृत्यूला कारणीभूत ठरत असून, हे रस्ते आपल्या खराब दर्जाने कुख्यात ठरत आहेत. हिवरखेड-तेल्हारा हा रस्त्याही याच कुख्यात मार्गापैकी एक. या रस्त्याने हिवरखेडच्या एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


यापूर्वी सुद्धा अकोला जिल्ह्यातील रस्त्यांवर अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हे सर्व अपघाती मृत्यू नसून, एक प्रकारे यंत्रणांच्या निष्काळजीपणाचे बळी आहेत. झोपेचे सोंग घेतलेले लोकप्रतिनिधी, अधिकारी, अभियंते, कंत्राटदार, शासन, प्रशासन आणि भ्रष्टाचारात बरबटलेल्या संबंधितांनी केलेल्या हत्याच आहेत, असा आरोप जनतेतून होत आहे.

हिवरखेड येथील विधवा महिला पुष्पा जयदेव ठाकरे (वय ५०) या. ता. १ डिसेंबर रोजी मुलगा महेंद्र सोबत दुचाकीवर तेल्हारा येथे जात होत्या. परंतु रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे गोर्धा ते बेलखेड दरम्यान रस्त्यांवरील धूळ, माती, आणि दगडांमुळे दुचाकी स्लिप होऊन दोघेही मायलेक दुचाकीसह रस्त्यावर आदळले.

यामध्ये पुष्पा ठाकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. उपस्थित व्यक्तींनी त्यांना तत्काळ तेल्हारा येथे नेले, तेथून त्यांना रुग्णवाहिकेने अकोला येथे रेफर करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना स्वखर्चाने नागपूर येथे न्यावे लागले. परंतु २ डिसेंबर रोजी पहाटे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, एकीकडे जनतेला विकासाचे स्वप्न दाखवून मतदारसंघ भकास करणारे आणि दुसरीकडे जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे तथाकथित कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय असे दोन्ही प्रकारचे लोकप्रतिनिधी एकाच माळेचे मणी असल्याची भावना सुद्धा जनतेत निर्माण होत आहे.

कंत्राटदाराने लोकप्रिय लोकप्रतिनिधींच्या दहा दिवसांच्या अल्टिमेटमची पुंगळी करून फेकण्याला अनेक महिने झाले असतानाही संबंधित कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी अकोला जिल्ह्यातील कुख्यात रस्त्यांबाबत झोपेचे सोंग घेऊन गप्प बसलेले असल्याने जनतेमध्ये विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. अकोला जिल्ह्यातील कुख्यात रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली असल्याने ह्या रस्त्यांवर अनेक अपघात घडत असल्याने घरी पोहोचेपर्यंत प्रवाश्यांचे कुटुंबीय काळजीत असतात. शासन आणखी किती मृत्यूची वाट बघत आहे, हा प्रश्न नागरिक विचारत असून, लवकरच परिस्थिती न सुधारल्यास मोठा जनक्षोभ उफाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


तेल्हारा-हिवरखेड रस्त्यांवर मला रोज दुचाकीने प्रवास जीव धोक्यात घालून करावा लागत आहे. या रस्त्यांच्या कामात संबंधितांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे दिसत असून, लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी या गंभीर मुद्द्यावर गप्प कसे बसलेले आहेत हा प्रश्न आहे.
-विलास देऊळकार, माजी सैनिक, हिवरखेड

(संपादन - विवेक मेतकर)

loading image