Akola : आता ग्रा. पं.मध्येही ओबीसीला फटका; खुल्या प्रवर्गातून भरणार पदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grampanchayat sarpanch

Akola : आता ग्रा. पं.मध्येही ओबीसीला फटका; खुल्या प्रवर्गातून भरणार पदे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्यामुळे ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची पदे रिक्त करण्यात आली होती. त्यानंतर सदर पदे आता खुल्या प्रवर्गातून भरण्यात आली आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सुद्धा आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्यामुळे आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गाचे एकूण आरक्षण २७ टक्क्यांपर्यंतच ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे यापूर्वी ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या १२३ जागा आता खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींच्या १२३ जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार असल्याने त्याचा ओबीसीला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्यामुळे या विषयी सर्वात आधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याच वेळी काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने या विषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण ५० टक्क्यांमध्ये ठेवत ओबीसी आरक्षणातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे व सदर जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समितीच्या २८ जागांवर गडांतर आले होते. त्यासाठी पोटनिवडणूक घेवून सदर जागा नुकत्याच खुल्या प्रवर्गातून भरण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने १९८ ग्रामपंचायतींच्या ३९८ रिक्त पदांकरीता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी २१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा: ST Strike: 'तोपर्यंत अंतरिम वाढीचा पर्याय दिलाय' - अनिल परब

परंतु निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींचे आरक्षण ५० टक्क्यांवर जात असलल्यास संबंधित ग्रामपंचायतींमधील ओबीसीच्या जागा खुल्या प्रवर्गातून व राज्य शासनाने नव्याने बहाल केलेले ओबीसीचे आरक्षण २७ टक्क्यांवर जात असल्यास ते कमी करण्याचे आदेश दिल्यामुळे जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींमधील १२३ जागा आता खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. सदर जागा यापूर्वी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहत होत्या परंतु त्याआता खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.

अशा कमी झाल्या ग्रामपंचायतीमधील ओबीसींच्या जागा

तालुका ग्रा.पं. सदस्य संख्या

तेल्हारा ०२ ०२

अकोट १९ २०

मूर्तिजापूर ३४ ४२

अकोला २२ २७

बाळापूर ०९ ०९

बार्शीटाकळी १२ १३

पातूर ०९ १०

--------------------------------

एकूण १०७ १२३

loading image
go to top