अकोला : काटेपूर्णातून रब्बीत होणार पूर्णक्षमतेने सिंचन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katepurna Barrage

अकोला : काटेपूर्णातून रब्बीत होणार पूर्णक्षमतेने सिंचन

अकोला : यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील दोन्ही मोठ्या प्रकल्पांसह सर्वच प्रकल्प तुडुंब भरले आहेत. सर्व प्रमुख प्रकल्पात पुरेश पाणी असल्याने रब्बी हंगामात पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी देण्याची तयारी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे. काटेपूर्णा प्रकल्पावर या हंगामात सुमारे सात हजार हेक्टरपर्यंत सिंचन क्षेत्राचे लक्ष्य गाठण्याची तयारी आहे. प्रकल्पातून पहिले आवर्तन या महिन्याच्या अखेरीस सोडण्याची तयारीसुद्धा केली जात आहे.

काटेपूर्णा प्रकल्प यंदा १०० टक्के भरला होता. या मोसमात ऑगस्टपासूनच प्रकल्पातून अनेकदा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्गही करण्यात आला. प्रकल्प पूर्ण भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या प्रकल्पावर रब्बीत सुमारे आठ हजार ३०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता आहे. पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून हे पाणी वितरीत केले जाते.

हेही वाचा: मुंबई मनपाला अध्यादेशाची प्रतीक्षा; निवडणूक लांबणीवर पडणार?

खरीपातील पिकांची काढणी करून शेतकरी रब्बीत गहू, हरभऱ्याची पेरणी करतात. सध्या ही काढणी शेवटच्या टप्‍प्यात असून, लवकरच रब्बीची लागवड सुरू होईल. यासाठी या प्रकल्पातून पाणी दिले जाणार आहे. पाणी वितरणाच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांसोबत नियोजनात्मक बैठक घेतली. यामध्ये ता. २७ नोव्हेंबरला पहिले पाणी सोडण्याची तयारी आहे. अवकाळी पाऊस आल्यास हे नियोजन थोडे पुढे जाऊ शकेल. अन्यथा याच तारखेला वितरण होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दुरुस्तीच्या कामांना गती

पाणी वितरणाच्या दृष्टीने उपलब्ध झालेल्या पैशातून कालव्यांची स्वच्छता, सरळीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. काही कामे मजुरांकडून काही यंत्रांच्या साह्याने केली जात आहेत. ही कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. परंतु शासनाकडून मुबलक प्रमाणात निधी नसल्याने उपलब्ध निधीवर भागवण्याची वेळ प्रशासनापुढे आलेली आहे. यामधून महत्वाची केली जात आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे कालव्यांना फटका बसलेला आहे. बहुतांश भागात कालव्यात झाडेझुडूपे, गवत वाढलेले आहे. त्यांची साफसफाई करण्यासाठी निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात गरजेची होती. याबाबत पाणी वापर संस्थांनी मागणीही केली होती.

"गेल्या हंगामात या प्रकल्पावरून सुमारे सहा ५०० हेक्टरवर सिंचन झाले. यंदा पाणी मुबलक असल्याने हे नियोजन सात हजार हेक्टरपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. पाणी वाटपाच्या दृष्टीने पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठकही घेण्यात आली. त्यात नियोजनात्मक चर्चा झाली."

- विशाल कुळकर्णी, सहायक कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला

loading image
go to top