येथे  मिळतोय दुधाला राज्यात सर्वाधिक दर!, शेतकऱ्यांचे हीत जोपासून ‘मनोज’ने कमावली दुग्ध व्यवसायात विशेष ख्याती

पी.डी. पाटील
Saturday, 25 July 2020

राज्यात दूध पेटले, दर वाढीसाठी शेतकरी संघटना एकवटल्या, विरोधी पक्षाकडून या विषयावर राजकारणही सुरू झाले. दुधाला सरकारकडून दरवाढ मिळेल की नाही, हे अजून स्पष्ट नाही. पण, रिसोड येथील युवा उद्योजक मनोज जाधव मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक दर देत आहे.

रिसोड (जि.वाशीम) ः राज्यात दूध पेटले, दर वाढीसाठी शेतकरी संघटना एकवटल्या, विरोधी पक्षाकडून या विषयावर राजकारणही सुरू झाले. दुधाला सरकारकडून दरवाढ मिळेल की नाही, हे अजून स्पष्ट नाही. पण, रिसोड येथील युवा उद्योजक मनोज जाधव मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक दर देत आहे.

एवढेच नाही तर, मनोजने एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन अल्पावधीत व्यापार, उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळखी निर्माण केली आहे. राज्यात दूध उत्पादन व प्रक्रिया उद्योगात पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व आहे. त्यामुळे दूध आंदोलनाची तिव्रताही त्या भागात जास्त दिसून येते. विदर्भात मात्र राजकीय पक्ष सोडता, शेतकरी या आंदोलनात फार सक्रिय झाल्याचे दिसून येत नाही. त्याचे कारण म्हणजे दुधाची होणारी किरकोळ विक्री! मुळात वाशीम जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमीच आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी ४५ ते ५० रुपये दरानेच दुधाची किरकोळ विक्री करतात तर, काही शेतकरी खासगी डेअरीला दूध देतात.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मनोज जाधव असा देतात अधिक दर
रिसोड येथे १२ वर्षांपासून मनोज जाधव याची ‘सृष्टी’ दूध डेअरी आहे. तो शेतकऱ्यांना सहा रुपये प्रति फॅट इतका दर देतो. जो पश्चिम महाराष्ट्रातील दूध डेअरीच्या तुलनेत जास्त आहे. सध्या मनोजने रिसोड तालुक्यातील प्रत्येक गावात दूध उत्पादकांचे जाळे विणले आहे. अनेक मोठ्या गावांमध्ये दूध संकलन केंद्रे उभी केली आहेत. यातून रोज हजारो लिटर दूध संकलित केले जात आहे.

जिल्ह्यात दूध उत्पादनास वाव
मनोज म्हणाला, शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव देणे शक्य आहे. वाशीम जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जिल्ह्यात रोज १५ ते २० हजार लिटर दूध पश्चिम महाराष्ट्रातून येते. त्याचा दर साधारणतः ४५ रुपयांपर्यंत असतो. फॅट मात्र फक्त तीन असते. नाइलाजाने ग्राहक ते खरेदी करतात. पण, आपल्या दुधाची फॅट सहा पर्यंत असते आणि दर मात्र ५० रुपये. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० हजार लिटर दूध उत्पादनास वाव आहे.

जिल्ह्यात दूध प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, प्रशासकीयस्तरावरून प्रतिसाद मिळत नाही. जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन प्रकिया उद्योग उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ उभे केल्यास शेतकऱ्यांना सात रुपये फॅट प्रमाणे दर देणे शक्य होईल.
- मनोज जाधव, दुग्ध व्यावसायीक, रिसोड

फॅट आणि एसएनफ म्हणजे काय?
दुधाचा दर हा त्यातील फॅट आणि डिग्री (एसएनएफ) यावर अवलंबून असल्यामुळे कमी फॅट असणाऱ्या दुधास दर कमी मिळतो. ‘फॅट’ हे प्रामुख्याने खाद्यातील फॅट, शरीरात साठलेली चरबी व कासेत तयार होणारे फॅट यापासून बनलेले असते. जनावरांना चाऱ्यामध्ये जर ऊर्जा व तंतूमय पदार्थ जास्त असलेले घटक खायला घातले तर जनावराच्या शरीरात असणाऱ्या उपयोगी सूक्ष्मजीवाची चांगली वाढ होते व ते पुरेशा प्रमाणात फॅट तयार करतात. हे फॅट रक्तामार्फत कासेत येऊन दुधात उतरते. एसएनफ म्हणजे फॅट सोडून इतर स्थायू घटक (प्रथिने-केसिन, जीवनसत्वे, खनिजे, लॅक्टोज). केसिन हा दुधातील एसएनफवर परिणाम करणारा मुख्य घटक आहे. याचे प्रमाण जर कमी झाले तर दुधाला एसएनफ लागत नाही, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Akola Risod, milk is getting the highest price in the state!