अकाेला : शेतकरी हवालदिल; आर्थिक मदतीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Ruikhed heavy rain crop Damage

अकाेला : शेतकरी हवालदिल; आर्थिक मदतीची मागणी

रुईखेड : परिसरात ता. २३ व २४ जून रोजी वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे केळीसह संत्रा, लिंबू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गानेही सुरुवातीलाच संकटात टाकले आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रुईखेड परिसरात बगायती क्षेत्र असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करतात. ता. २३ आणि २४ जून रोजी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातच पाणी आणले आहे. परिसरात आधीच शेतकरी वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने हैराण झाले आहेत, त्यात आता निसर्गाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी मॉन्सूनच्या सुरुवातीलाच अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संबंधित विभागाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी लावलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यातच गेल्याने शेतकऱ्यांच्याही डोळ्यात पाणीच दिसत आहे.

केळीचे बाग करण्यासाठी शेतकऱ्यांनी उसनवारी, बँक कर्ज काढून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या नुकसानामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत टाकले आहे. लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा करावा व शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी रुईखेड परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

वादळामुळे माझ्या शेतातील केळीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. रात्रंदिवस मेहनत करून केळीचे पीक जगविले. परंतु, तोंडाशी आलेला घास निघून गेला. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.

- नीता मेतकर, केळी उत्पादक, रुईखेड.

सतत दोन दिवस रुईखेड परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे सत्राचे ४० ते ५० झाडे जमीनदोस्त झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.

- वैभव शेळके, शेतकरी, रुईखेड.

Web Title: Akola Ruikhed Heavy Rain Crop Damage Farmer Demand For Financial Help

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..