esakal | हे काय? पेरणी डोक्यावर अन् खते, बी-बियाणे विकत घ्यावे तरी कसे
sakal

बोलून बातमी शोधा

agriculture.jpg

शासकीय खरेदीवर नोंदणी करून सुद्धा अद्यापही नंबर न आल्याने तालुक्यातील 60 गावातील एक हजार 238 शेतकऱ्यांकडे 40 हजार क्विंटल कापूस अद्यापही पडून आहे. कापूस विकल्या गेला नसल्याने पेरणीची वेळ डोक्यावर आली असताना खते, बी-बियाणे खरेदी करावे तरी कसे असा प्रश्‍न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

हे काय? पेरणी डोक्यावर अन् खते, बी-बियाणे विकत घ्यावे तरी कसे

sakal_logo
By
धर्मेश चौधरी

तेल्हारा (जि. अकोला) : लॉकडाउन मुळे खासगी कपाशी खरेदी करणारे व्यापारी नाही तर शासकीय खरेदीवर नोंदणी करून सुद्धा अद्यापही नंबर न आल्याने तालुक्यातील 60 गावातील एक हजार 238 शेतकऱ्यांकडे 40 हजार क्विंटल कापूस अद्यापही पडून आहे. कापूस विकल्या गेला नसल्याने पेरणीची वेळ डोक्यावर आली असताना खते, बी-बियाणे खरेदी करावे तरी कसे असा प्रश्‍न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

हेही वाचा- दुर्दैवी: मेळघाटातील डॉक्टराचा अकोल्यात मृत्यू!

अल्पदरात होताहे मागणी
तालुक्यात एकूण 53 हजार 531 हेक्टर क्षेत्र हे पेरणीयोग्य शेती आहे. गतवर्षी 24 हजार 842 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली होती. सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके संकटात सापडली होती. नंतर बोंड अळीने आक्रमण केल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना यातून सुटका करण्याकरिता मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाची फवारणी करून कसेबसे कपाशीचे पीक घेता आले होते.

हंगामात उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात कपाशीचे पीक उशिरा आले. नंतर कोरोना मुळे शासनाने लॉकडाउन जाहीर केल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून कपाशीची खरेदी बंद झाली तर, काही व्यापाऱ्यांकडून अल्पदरात कपाशीची मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या घरात कापूस असताना सुद्धा विकता आला नाही. शासनाने फेडरेशन व सीसीआय मार्फत कपाशी खरेदी सुरू केली. परंतु, खरेदी केंद्रांची किमान संख्या आहे. तर, त्या तुलनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर अल्पप्रमाणात कपाशी खरेदी होत आहे.

क्लिक करा- अरे अरे अकोल्यात कोरोनामुळे मृत्यू सत्र सुरूच; एकाच दिवशी...

आकडा आणखी फुगणार
सध्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचा घरी जाऊन त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या कपाशीची नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत साठ गावातील नोंदणी झाली असून, यातील एक हजार 238 शेतकऱ्यांकडे 40 हजार क्विंटल कापूस पडून असल्याचे समोर आले आहे. अद्यापही अनेक गावाच्या शेतकऱ्यांचा कपाशी बाबत सर्वे सुरू असून, हा आकडा आणखी फुगणार आहे. एकीकडे घरात कपाशी पडलेली, घरखर्च करण्याकरिता लागणारा पैसा व पेरणीला जेमतेम कालावधी उरला असताना शेतीची आवश्यक मशागत करून खते, बी-बियाणे आदींची खरेदी करावी कशी अशी बिकट समस्या तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे. शासनाने शासकीय खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी जेणेकरून शेतकऱ्यांकडे असलेल्या कपाशीचे योग्य मोबदला मिळेल व पेरणी करिता आवश्यक कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना घेता येईल अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

प्रक्रिया गतिमान करणे गरजेचे
जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी सीसीआय व कापूस फेडरेशन यांना खरेदी पावसाळ्यापूर्वी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी ही प्रक्रिया गतिमान करणे गरजेचे आहे.
-डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक

दोन्ही ठिकाणी नोंदणी
कापूस विकण्यासाठी सीसीआय व फेडरेशन दोन्ही ठिकाणी नोंदणी केली आहे. परंतु, अद्यापही नंबर आला नसल्याने घरात ५० क्विंटल कापूस पडून आहे. पेरणीचे दिवस जवळ आले असून, खते, बी-बियाणे विकत घ्यावे कोठून असा प्रश्‍न पडला आहे.
-अरुण गडम, शेतकरी, निंबोळी

शासकीय स्तरावर काम सुरू
तालुक्यातील शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या कपाशीचा सर्वे सुरू आहे. आतापर्यंत 60 गावांचा सर्वे पूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या कपाशीची विक्री करून त्यांना पेरणी करिता आवश्यक असलेले खते, बी-बियाणे खरेदी करता यावे याकरिता शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
-मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी