अकोला : प्रदेशाध्यक्षांपुढे वाचला आमदारांविरुद्ध तक्रारीचा पाढा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Mitkari Latest Marathi news

अकोला : प्रदेशाध्यक्षांपुढे वाचला आमदारांविरुद्ध तक्रारीचा पाढा!

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर होते. मूर्तिजापूर येथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीत राकाँच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून निधी मिळत नाही, दिला तर त्यावर कमिशन मागितले जात असल्याचा आरोपी प्रदेशापुढे केला. त्यामुळे राष्ट्रवादीमधिल वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य अमोल मिटकरी हे नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत असता. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळ आवारात आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात ते चांगलेच वादग्रस्त ठरले होते. आता तर अकोला जिल्ह्यात त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी कमिशन घेत असल्याचा जाहीर आरोप केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. त्यासंदर्भातील एक चित्रफित (व्हिडीओ) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घात आहे. आढावा बैठकीतील या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऐकून घेतल्या असून, त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले आहे.

तक्रारकर्ते युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष

आमदार अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त झाले आहे. मात्र, त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात ५० कोटीचा निधी आणल्यानंतर त्यातून पक्षाच्या सदस्यांना विकास कामांसाठी निधी दिला नसल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे जिल्हाध्यक्षांना २० कोटीचा निधी देताना आमदारांनी कमिशन मागितल्याचा आरोपही खुद्द राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे केला.

जिल्हा परिषद सदस्यांचीही तक्रार

मूर्तिजापूर येथील आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे तक्रार करणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्यही आहेत. दगडपारवा जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या सुमनताई भास्कर गावंडे यांचा मुलगा व राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल गावंडे यांनी आमदारांकडून विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्षांकडे आढावा बैठकीत केली. आमदार मिटकरी यांनी १६ कोटीचा निधी एकट्या कुटासा गावात दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या गावात ना स्थानिक स्वराज्य संस्थेत, ना सोसायटीत राष्ट्रवादीला यश मिळाल्याचे विशाल गवंडे यांनी प्रदेशाध्यक्षांपुढे सांगितले.

आमदार म्हणतात बिनबुडाचे आरोप!

आमदार अमोल मिटकरी यांच्याबाबत प्रदेशाध्यक्षांपुढे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. या तक्रारी व आरोप बिनबुडाच्या आहेत. चर्चेतून मार्ग काढता येईल. राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. या कुटुंबात कुणाला काही अडचण असेल तर प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून मार्ग काढू, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

Web Title: Akola State President Read Complaint Against Mla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..