अकोला : सुपरस्पेशालिटी सुरू करण्यावरून वादंग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Super speciality hospital inauguration

अकोला : सुपरस्पेशालिटी सुरू करण्यावरून वादंग!

अकोला : जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निमवाडी येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु केले. सदर रुग्णालयासाठी खासदार संजय धोत्रे यांनी प्रयत्न केले. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी रुग्णालयासमोरील रस्ता बनवण्यासाठी पाठपुरावा केला. रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने येथे रुग्णांची कमालीची गैरसोय होऊ शकते, अशी टीका भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यावर सोमवारी सुपरस्पेशालिटीची ओपीडी सेवा सुरू करण्याच्या प्रसंगी केली. रुग्णालयाचे विधीवर लोकार्पण केंद्रीय व राज्यातील नेतृत्वांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल, असेही यावेळी आमदार सावरकर म्हणाले. त्यामुळे रुग्णालय सुरु करण्यावरून जिल्ह्यात वादंग झाल्याचे दिसून आले.

केंद्र व राज्य शासनाचे तब्बल १६० कोटी रुपये खर्च करुन स्थानिक निमवाडी परिसरात सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. सदर रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ व मशीन उपलब्ध नसल्याचे त्याचे उद्‍घाटन रखडले होते. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे काही विभागांसाठी विशेषज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवार (ता. १) पासून रुग्णालयातील हृदयरोग, किडनी रोग, बर्न व प्लास्टिक सर्जरी, मेंदू विकार या चार विभागातील बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) पासून सुरू करण्यात आली.

त्यामुळे रुग्णालयात नियुक्त डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी यांचे भाजपच्या वतीने सोमवारी (ता. १) पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना आमदार सावरकर यांनी जिल्हाधिकारी अरोरा यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता सुपरस्पेशालिटी सुरु केल्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली. या विषयावर भाजपचे आमदार श्रेय घेण्याचा प्रयत्न करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी भाजपचे सर्व आमदार कटीबद्ध असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. यावेळी भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चना मसने, अनुप धोत्रे, माधव मानकर, गिरीश जोशी व इतरांची उपस्थिती होती.

कोट्यवधी रुपयांची वैद्यकीय उपकरण पडून

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा मिळाव्यासाठी शासनाने कोट्‍यवधी रुपयांची वैद्यकीय उपकरणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवली होती. त्यापैकी काही उपकरणांचे इंस्टॉलेशन करण्यात आले आहे, तर काही उपकरण अद्याप सुपरस्पेशालिटी रुग्णालयात तसेच पडून आहेत. त्यामुळे सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील ओपीडीसेवा सुरू झाली असली तरी वैद्यकीय उपकरण मात्र पडून आहेत.

दर्शनी भाग चकाचक, इतर दुर्लक्षित

सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील ओपीडी सुरू करण्यात आल्याने रुग्णालयाती दर्शनी भाग चकाचक ठेवण्यात आला. परंतु आतमध्ये मात्र वैद्यकीय यंत्रसामग्री व इतर साहित्य पडून असल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्णालयातील चार विभागांची ओपीडी सेवा सुरु झाली असली तर इतर सेवा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Akola Super Speciality Hospital Inauguration Mla Randhir Savarkar Criticism On District Collector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..