Akola : थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा अनुभव!

स्वपक्षीयांच्याच नगरसेवकांना अंधारात ठेवून घेण्यात आले ठराव
Akola mayor election from the people
Akola mayor election from the people

तेल्हारा : ‘ना ठेका, ना ठेकेदार, ना खायेंगे, ना खाने देंगे व पारदर्शक कारभार’ या धर्तीवर, अशा प्रकारच्या आश्वासनावर गत वेळी थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड झाली. परंतु, थेट नगराध्यक्ष निवडीचा अनुभव येथील नगरपालिकेत फार वाईट आल्याचा दिसून आले. कारण मनमानी कारभार, नागरिकांना धमक्या व स्वपक्षीय नगरसेवकांना सुद्धा अंधारात ठेवून घेण्यात आलेल्या ठरावामुळे जनतेतून नगराध्यक्ष निवडून गेल्यानंतर कसा कारभार चालतो व पारदर्शकतेचा चेहरा कसा टराटर फाडल्या गेला याचा प्रत्यय तेल्हारावासीयांना चांगल्या प्रकारे आल्यामुळे थेट जनतेतून नगराध्यक्षच्या निवडीबाबत अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नागरी सुधारणा अध्यादेश, महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयकावर सोमवारी शिक्का मोर्तब झाले, त्यामुळे पुढच्या निवडणुकांत नगराध्यक्ष व सरपंच हे थेट जेनतेतून निवडले जाणार आहेत. याबाबतचे विधेयक मार्गी लागल्यामुळे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीनंतर नगरपालिकेच्या कारभारावर काय परिणाम होतात? याबाबत अनेक राजकीय पक्षांनी आपले विचार मांडले असून, काही जणांचे म्हणणे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडल्यामुळे पारदर्शकता राहते असे आहे, तर थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीमुळे कसा मनमानी कारभार चालतो? असे अनेक प्रश्न या विधेयकाबाबत समोर आले आहेत.

गत निवडणुकीत येथील नगरपरिषदेत थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड झाली आणि त्यानंतर शासनाने नगराध्यक्षांना दिलेल्या अधिकारांचा कसा दुरुपयोग झाला? याचे एक नव्हे तर अनेक उदाहरणे नगरपरिषदेत दिसून आला. स्वपक्षीय सहकारी नगरसेवकांना अंधारात ठेवून ठराव मंजूर करून घेणे, स्वपक्षीय नगरसेवकांनीच नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये उपस्थित राहत नसल्याबद्दल त्यांच्या खुर्चीला हार घालून अभिनव आंदोलन करणे, भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे नगरसेवकांनी आरोप करणे, तशा प्रकारच्या तक्रारी करणे आणि नगराध्यक्षांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या विकास कामांच्या प्रश्नावर नागरिकांनाच तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, अशा प्रकारची धमकी देणे, अशा प्रकारचा कारभार गत पाच वर्षांत दिसून आल्यामुळे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवळीनंतरचे परिणाम काय होतात? हे चांगलेच दिसून आले.

थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडीचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य असून, या निर्णयामुळे संपूर्ण जनतेच्या मनातला नगराध्यक्ष निवडल्या जातो, त्यामुळे सर्वांचे कामे होतात. नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडीबाबत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होतात, त्यामुळे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड योग्य आहे. फक्त जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी कुणाच्याही दबावाखाली न येता सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे.

- महेंद्र गोयंनका, भाजप शहराध्यक्ष, तेल्हारा.

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड म्हणजे लोकशाहीचा विजय असून, सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे हे योग्य. परंतु, निवडीनंतर त्यांनी नैतिकता पालन न केल्यास मनमानी कारभार होण्याची शक्यता व धोरणात्मक निर्णय घेताना प्रत्येक प्रभागातील प्रतिनिधी यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- ॲड.पवन शर्मा, अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, तेल्हारा.

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवळीमुळे अल्पसंख्याक आणि छोटे-छोटे समाज घटक या पदापासून सदैव दूर राहणार ही मोठी शोकांतिका आहे. हा लोकशाहीला पोखरून टाकणारा निर्णय आहे.

- विकास पवार, शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, तेल्हारा.

थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड झाल्यास नगरसेवकांचे महत्त्व कमी होते व नगराध्यक्षांचा मनमानी कारभार चालू होतो, त्यामुळे विकास कामाला खिळ बसत असून, जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. हा गत पाच वर्षाचा अनुभव असल्यामुळे थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया थांबवावी.

- मितेश मल्ल, शहराअध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, तेल्हारा.

पारदर्शक कारभार चालावा याकरिता शासनाने थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड करण्याचे जे ठरविले आहे, तो अध्यादेश शासनाने मागे घेणे आवश्यक आहे. थेट नगराध्यक्षाची जनतेतून निवड झाल्यास नगराध्यक्षाचा मनमानी कारभार चालू होतो त्याचा अनुभव तेल्हारा नगरपालिकेमध्ये अनेकांना आला आहे.

- विक्रांत शिंदे, शहर प्रमुख, शिवसेना, तेल्हारा.

नगराध्यक्षांची निवड ही नगरसेवकांमधून झाली पाहिजे, कारण संबंधित नगरसेवक त्या-त्या प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडवू शकतो.

- संतोष छांगाणी, शहराध्यक्ष, रा.काँ. तेल्हारा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com