
अकाेला : तरुण वर्गात वाढते आहे शस्त्र बाळगण्याचे फॅड
तेल्हारा : गत वर्षभरात तालुक्यात शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी अनेक कारवाया केल्या आहेत. यामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींमध्ये बहुतांश आरोपी हे तरुण वर्गातील आहेत, त्यामुळे तालुक्यातील तरुण वर्गात शस्त्र बाळगण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे.
तालुक्यातील हिवरखेड व तेल्हारा शहर पोलिस स्टेशन अंतर्गत ‘आर्म्स ॲक्ट’च्या अनेक कारवाया गत वर्षभरात पोलिसांनी केल्या आहेत. काही दिवसाआधी तेल्हारा शहरात २२ वर्षीय तरुणांकडे गावठी पिस्टल सापडले होते. त्याचप्रमाणे शहरातच वेगवेगळ्या घटनेत पुन्हा एक गावठी पिस्टल, रामपुरी चाकू, सुरा, हनवाडी येथे नंगी तलवार आदी शस्त्र जप्त करून पोलिसांनी शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. नुकतेच जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत अडगाव येथे दोन तलवारी, दोन फरशी कुऱ्हाड व एक रामपुरी चाकू आदी शस्त्र जप्त केले.
तालुक्याला लागूनच सातपुडा पर्वतरांगामध्ये मध्यप्रदेश या राज्याची सीमा आहे. याभागातून पिस्टलसह वेगवेगळे शस्त्रांची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री व वाहतूक केल्या जाते व येथूनच तालुक्यात शस्त्र विकत आणल्या जातात. अनेक घटनांमध्ये सराईत गुन्हेगार गुन्ह्याच्या घटना घडविण्यासाठी शस्त्राची गरज राहते, म्हणून शस्त्र विकत घेतात तर याव्यतिरिक्त काही तरुण छंद म्हणून शस्त्र विकत घेतात. हल्ली वेगवेगळे शस्त्र जमविणे, त्यांच्यासोबत सेल्फी काढणे, वाढदिवसाला तलवारीने केक कापणे व हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे हा छंद तरुणांमध्ये वाढत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो पाहून इतर तरुणामध्येंही शस्त्राबद्दल कुतूहल निर्माण होतो व यातून तरुणांमध्ये शस्त्र बाळगण्याची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
किरकोळ वाद झाला असता, टोकाची भूमिका घेत आपल्या जवळील शस्त्राचा वापर सुद्धा आपल्या हातून होऊ शकतो व घडलेल्या गुन्ह्यामुळे आपले भविष्य संपू शकते याची जाणीव देखील या तरुणांना नसते. पालकांनी आपला पाल्य काय करतो?, कुणासोबत राहतो?, कुठे जातो?, त्याच्या सोशल मीडियावरील ऍक्टिव्हिटी काय? आदी बाबींवर वेळीच लक्ष दिले, तर मुलाचे भविष्य बिघडणार नाही व त्यांनी भविष्यात त्यांच्यासाठी पाहलेले स्वप्नही भंगणार नाही एवढे मात्र निश्चित.
शस्त्रसाठा येण्याची माहिती मिळत नाही का?
शहरात, गावात अमुक व्यक्तीकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती संबंंधित विभागाला मिळते, मग हाच शस्त्रसाठा त्या-त्या शहरात, गावात कोणत्या मार्गाने येते? कोण आणते? याची माहिती संबंधित विभागाला मिळत नाही का? असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वेळीच त्यांना यासर्व गोष्टीची माहिती मिळाली, तर शस्त्रसाठा सीमेवरच जप्त केल्या जाणार असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. कुणाकडे कसल्याही प्रकारचे शस्त्र असल्यास नागरिकांनी याबाबत नजीकच्या पोलिस स्टेशनला माहिती द्यावी. आपला पाल्य कुठलं चुकीचे किंवा गैरकायदेशीर कृत्य करत नाही याबाबत पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे.
- जी.श्रीधर, जिल्हा पोलिस अधीक्षक, अकोला.