Akola : धावत्या रेल्वेत चढताना पडलेल्या युवकाला पोलिसांनी वाचविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रेन

Akola : धावत्या रेल्वेत चढताना पडलेल्या युवकाला पोलिसांनी वाचविले

अकोला : धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती गाडीतून पडला आणि बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सोमवारी रात्री 9 वाजून 26 मिनिटांनी विदर्भ एक्स्प्रेस अकोला रेल्वे स्थानकावर सुटली असता एक प्रवासी धावत आला आणि त्याने गाडीत चढण्याचा प्रयत्न केला.

तो रेल्वेत चढत असतानाचा त्याचा तोल गेला आणि तो खाली निसटला, तो चाकाखाली जाणार तोच रेल्वे पोलिस प्रसंगावधान राखत धावत आला आणि त्याला बाहेर खेचले. अगदी काही सेंकदाच्या या प्रसंगावधानाने प्रवाशाचा जीव वाचला.

गाडी रेल्वेस्थानकावर थांबल्यानंतर गाडीतून खाली उतरणे आणि चढणे, तसेच उशिरा पोहचणे आणि गाडी सुटल्यानंतर धावत धावत पकडण्याची सवय अनेकांना असते. मात्र, ही सवय जीवावर कशी बेतू शकते, याचा जीवघेणा अनुभव सोमवारी रात्री विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चढताना एका प्रवासाने घेतला.

विदर्भ एक्स्प्रेस रेल्वेस्थानकावरून मार्गस्थ होत असताना तो प्रवासी धावत धावत आला आणि त्याने गाडी पकडली. मात्र गाडीत चढल्यानंतर दरवाज्यात उभा राहत नाही तोच त्याचा तोल गेला आणि खाली कोसळला.

मात्र त्याने दरवाजा घट्ट पकडून ठेवल्याने आणि सुदैवाने फलाटफॉर्मवर गस्तीवर असलेले रेल्वे पोलिस कर्मचारी विलास पवार यांनी धावत जावून या व्यक्तीला गाडी आणि फलाटाच्या मधून ओढून घेतले. अन् त्याचा जीव वाचवला. त्यानंतर रेल्वेही थांबली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.