
अकोला : अकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूर्णा नदीवर असलेल्या गांधीग्राम येथील पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. पर्याय वाहतुकीची व्यवस्था म्हणून रेल्वेकडून अकोला-अकोट गाडी सुरू केली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येत असलेल्या या गाडीची वेळ मात्र, त्यांनाच गैरसोयीची ठरणार असल्याने या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचे रिकामे डब्बे बघण्याची वेळ येऊ शकते.
अकोला-अकोट दरम्यान प्रवास करणाऱ्यांमध्ये शासकीय व खासगी नोकरी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शासकीय कार्यालयांची वेळ व बाजारपेठ सुरू होण्याची वेळ ही किमान १० वाजताची आहे. गाडी अकोला येथून सकाळी ६ वाजता सुटणार आहे. अकोला येथे ७.२० वाजता गाडी पोहोचणार आहे. त्यामुळे या गाडीने अकोटपर्यंत प्रवास करणाऱ्याला चार तास थांबवून कार्यालय किंवा दुकान उघडण्याची वेळ करावी लागणार आहे.
अकोटवरून सकाळी ८ वाजता निघणारी गाडी सकाळी ९.२० वाजता अकोल्याला पोहोचणार आहे. त्यामुळे पुढेचे काही त्यांनी काय कराव, हा प्रश्नच आहे. ही गाडी अकोट, अकोला, परतवाडा व आसपासचे सर्व ग्रामीण भागातील नोकर, चाकर, विद्यार्थी या सर्वांसाठी लाईफ लाईन ठरणारी आहे. त्यामुळे या गाडीचे वेळापत्रक तयार करताना या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. अन्यथा नागरीक कंटाळून परत त्या तुटक्या पुलाला प्राधान्य देतील, अशी भिती आहे.
अकोटपर्यंत सर्व गावांना गाडी थांबायला हवी. ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय होता कामा नये. नाहीतर नागरीक स्वतःचा विचार करतील आणि रेल्वेचे रिकामे डब्बे बघण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अकोला-अकोट रेल्वेच्या वेळापत्राबाबत विचार करावा, अशी मागणी नागरिकांतर्फे निशांत सुरंसे यांनी केली आहे.