
अकोला : सभापतींनीच नाकारला खातेवाटपाचा विषय
अकोला : जिल्हा परिषदेचे विषय समिती सभापती सम्राट डोंगरदिवे यांना खाते वाटप करण्याच्या विषयावर आतापर्यंतच्या सर्वसाधारण सभांमध्ये घमासान झाले. या विषयावर सत्ताधारी आणि सभापती डोंगरदिवे यांच्यासह शिवसेना व इतर पक्षांनी सभेत नेहमीच गोंधळ घातला. परंतु मंगळवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत खुद्द विषय समिती सभापती डोंगरदिवे यांनी खाते वाटप करण्याचा विषय मागे न ठेवता चर्चेलाच घेण्यास नकार दिला. आतापर्यंत खातेवाटप होणे आवश्यक असल्यानंतर सुद्धा सत्ताधाऱ्यांनी अन्याय केल्याने एक महिन्यासाठी या विषयावर निर्णय न घेण्याची भूमिका सभापती डोंगरदिवे यांनी सभागृहात व्यक्त केली. त्यामुळे सदर विषय शेवटी घेण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी निरर्थक ठरली.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात मंगळवारी जि.प.ची सर्वसाधारण सभा आयोजित पार पडली. सभेत सर्वात आधी मागील सभेच्या इतिवृत्तावर चर्चा करुन त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर विषय सूचिवरील इतर नऊ विषयांवर चर्चेला सुरुवात झाली. त्यापैकी दुसरा व आतापर्यंत सर्वाधिक वादग्रस्त ठरलेला विषय विषय समिती सभापती सम्राट डोंगरदिवे यांना खाते वाटप करण्याचा विषय सभेचे सचिव सूरज गोहाड यांनी वाचून दाखविला. सदर विषयावर विरोधक आक्रमक होत असल्याने सदर विषय सभेच्या शेवटी घेण्याचे अध्यक्ष प्रतीभा भोजने यांनी जाहीर केले.
त्याचा विरोधकांद्वारे विरोध होत असतानाच सभापती सम्राट डोंगरदिवे यांनी खुर्चीवरुन उठून बोलण्यास सुरुवात केली. त्यांना वंचितचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी बोलण्यास विरोध केला व अध्यक्षांनी सांगितल्यामुळे या विषयावर नंतर चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. परंतु माझे बोलने ऐकून घ्या, या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यायेवजी चर्चाच करु नका, खाते वाटप यापूर्वीच व्हायला हवे होते परंतु माझ्यावर सभागृहात अन्याय झाला त्यामुळे आता सभापतींचा कार्यकाळ संपत असतानाच मला खाते नको, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सभेत आतापर्यंत सर्वाधित वादग्रस्त ठरलेला विषय काही मिनीटातच संपला. सभेत अध्यक्ष प्रतीभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्फूर्ती गावंडे, सभापती सम्राट डोंगरदिवे, पंजाबराव वडाळ, आकाश शिरसाट, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यासह जि. प. सदस्य, शासकीय यंत्रणांचे प्रमुखांची उपस्थिती होती.
गुणवत्तापूर्ण बांधकामांकडे दुर्लक्ष
सभेत दहिहांडा येथे ग्रामीण रुग्णालय मंजुर झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा हस्तांतरित करणे या विषयावर चर्चा होत असताना शिवसेना सदस्य गोपाल दातकर यांनी निराट वैराटमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. ठेकेदार बिलोमध्ये काम घेवून अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम करत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी बांधकाम विभागाचे अभियंता गणेश रंभाड यांना धारेवर धरले. निराट-वैराट येथील निकृष्ट बांधकाम प्रकरणी शाखा अभियंत्यांसह इतरावर कारवाईची मागणी त्यांनी लावून धरली. त्यावर उत्तर देत अभियंता रंभाड यांनी यानंतर चांगल्या दर्जाचे बांधकाम होईल, याचे आश्वासन सभेत दिले.
दीड वाजता सुरु, अडीच वाजता संपली
नियोजित वेळेनुसार सर्वसाधारण सभा १ वाजता आयोजित करण्यात आली होती. परंतु सभेला अर्धातास म्हणजेच १.३० वाजता सुरुवात झाली. त्यानंतर केवळ विषय सुचिवरील नऊ विषयांवरच चर्चा करण्यात आली व अडीच वाजता सभा संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.
मिनिटात विषयांना मंजुरी
सर्वसाधारण सभेच्या विषय सूचिवर एकूण नऊ विषयांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी आठ विषयांना मोजक्याच चर्चेनंतर मंजूरी देण्यात आली, तर क्रमांक दोनचा खातेवाटपा विषय स्वतः सभापतींनीच नाकारल्याने त्यावर निर्णयच होऊ शकला नाही.
Web Title: Akola Zilla Parishad Shiv Sena Speaker Account Sharing Meeting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..