
अकोला - अकोट पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या गोवर्धन हरमकारच्या मृत्यू प्रकरणाने पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे. या प्रकरणात चुपी साधून बसलेल्या ठाणेदार तपन कोल्हे यांची अखेर उचल बांगडी करीत कंट्रोल रूम अटॅच करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अमोल माळवे यांना तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.
'सकाळ'मध्ये शुक्रवारी 'अकोटचे ते पाच पोलिस अजूनही ‘गायब’, ठाणेदार म्हणतात ‘माहित नाही’, एसपींचेही ‘कानावर हात’' या शीर्षकाखाली प्रकाशित बातमीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ही कारवाई केली आहे.
सविस्तर असे की, मोबाईल चोरीच्या संशयावरून अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे आणि इतर ५ पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी गोवर्धनला अटक केली होती. त्यानंतर १६ जानेवारीला सुकळी गावात आणत घर झडती घेतली. गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. १६ जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अकोट पोलीस ठाण्यात गोवर्धनच्या मृत्यू प्रकरणानंतर मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, श्री. पंचांग, श्री. सदांशिव हे कर्मचारी घटनेपासून हजर झाले नाही. तरीसुद्धा शहर पो.स्टे.चे ठाणेदार तपन कोल्हे यांनीही ते गायब असल्याबाबत वरिष्ठांना माहिती दिली नाही तसेच त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही.
जवळपास २० दिवस उलटले तरी हे कर्मचारी कुठे आहेत हे अकोट पोलिसांकडून दडपण्यात आले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळेच पोलीस अधीक्षकांनी ठाणेदार तपन कोल्हे यांच्या कार्यावर शंका उपस्थित करीत त्यांना हेडक्वार्टर अटॅच केले आहे. आता या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके यांच्यासोबतच ठाणेदार तपन कोल्हे यांचे नावही जोडल्या गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता पोलीस प्रशासन कुठली कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एचडीपीओ मित्तल यांचीही चौकशी व्हावी!
सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अकोट उपविभागाचे पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांचीही या प्रकरणात चौकशी करण्याची गरज आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात एका संशयित आरोपीचा मृत्यू होतो, त्याच पोलीस ठाण्यातील पाच पोलीस कर्मचारी मागील वीस दिवसांपासून गायब राहतात. तसेच ठाणेदार तपन कोल्हे सुद्धा मूग गिळून बसले आहेत. हा सर्व प्रकार माहिती असताना सुद्धा एसडीपीओ अनमोल वित्तल यांनी जाणीवपूर्वक आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप गोवर्धनच्या नातेवाईकांनी केला आहे त्यामुळे आयपीएस मितल यांची सुद्धा सीआयडीने या प्रकरणात चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
‘ते’ पाच पोलीस स्वतःहून हजर होण्याची शक्यता!
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट पोलिस स्टेशनमधील गायब पाच पोलीस कर्मचारी दोन दिवसात पोलीस स्टेशनला हजर होण्याची शक्यता आहे. तर ठाणेदार तपन कोल्हे यांच्यावरही शेकण्याची शक्यता आहे.
सीआयडीचा तपास योग्य मार्गावर!
गोवर्धनच्या मृत्यू प्रकरणाचा सीआयडी कडून योग्य मार्गाने तपास सुरू आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती देता येऊ शकणार नाही.
- अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, सीआयडी, अमरावती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.