Amravati : पक्षपातीपणाचा आरोप आपल्याला अमान्य ; बिगबॉसचे स्पर्धक शिव ठाकरे यांचे प्रतिपादन Amravati Bigg Boss contestant Shiv Thackeray city after final round | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Shiv Thackeray

Amravati : पक्षपातीपणाचा आरोप आपल्याला अमान्य ; बिगबॉसचे स्पर्धक शिव ठाकरे यांचे प्रतिपादन

अमरावती : लाखो रसिकांना वेड लावणाऱ्या बिगबॉसमध्ये अखेरच्या क्षणी स्पर्धेतून बाहेर पडलेला अमरावतीकर शिव ठाकरे याने बिगबॉसच्या निर्णयात कुठल्याही प्रकारचा पक्षपात झाल्याचे अमान्य केले आहे. माझा स्पर्धक असलेल्यांकडे माझ्यापेक्षाही भरपूर टॅलेन्ट असल्याने त्याने त्याच्या हक्काची ट्रॉफी मिळविली. मला मात्र त्यातही आनंदच झाल्याचे त्याने सांगितले.

बिगबॉस स्पर्धेची अंतिम फेरी संपल्यानंतर शिव ठाकरे याचे शहरात प्रथम आगमन झाले. यावेळी अमरावतीकर तरुणाईकडून त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्याने सांगितले की, अमरावती शहरातील एका साध्या कुटुंबातील युवकाला बिगबॉसने आज जी ओळख दिली ती आयुष्यात कधीही विसरता येणार नाही. बिगबॉसमध्ये प्रवेश केवळ अमरावतीकरांच्या प्रेमामुळेच झाला.

प्रत्येक टप्प्यावर अमरावतीकर तसेच मित्रमंडळींचे सहकार्य मिळत गेल्याने आपण ही उंची गाठल्याचे त्याने सांगितले. बिगबॉसच्या अंतिम विजेतेपदाबद्दल तो म्हणाला, मी स्वतःचे संपूर्ण कौशल्य पणाला लावले होते, मात्र माझ्यापेक्षाही टॅलेन्टेड स्पर्धकाला विजेतेपद मिळाले, त्याने त्याच्या हक्काची ट्रॉफी मिळविली, याचे कौतुक असल्याचे शिव ठाकरे याने सांगितले. ज्यावेळी आपण प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला ते मिळविता येत नाही, त्यावेळी नशीब दुसरे दार उघडत असते, असा आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे बिगबॉसमध्ये पराजयाचा सामना करावा लागला असला ती भविष्यात मात्र अशा संधी येतच राहणार, यावर माझा ठाम विश्वास असल्याचे शिव ठाकरे यांनी सांगितले.

अमरावतीत अ‍कॅडमीचे प्रयत्न

अमरावती तसेच विदर्भातील तरुणाईमध्ये भरपूर टॅलेन्ट आहे. त्याचा त्यांच्या करिअरकरिता उपयोग झाला पाहिजे, यादृष्टीने भविष्यात अमरावतीमध्ये अ‍ॅकॅडमी सुरू करण्याचा आपला मानस आहे. मुंबईतील चित्रसृष्टीतील मान्यवरांचे या युवकांना मार्गदर्शन मिळेल, असा आपला प्रयत्न असणार असल्याचे शिव ठाकरे याने सांगितले.