
शासनाकडून शेतमालाची योग्यवेळेत व योग्यप्रमाणात हमीभावाने खरेदी केली जात नाही. व्यापारी वर्ग त्याचा फायदा उचलत कवडीमोल दराने शेतकऱ्यांचा शेतमाल घेतात. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालवत गेली आहे.
अकोला : जिल्ह्यात दिवसेंदिवस रब्बी पिकांचे क्षेत्र घटत असून, यावर्षी केवळ ६७ टक्के म्हणजे ७२ हजार ४४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये सुद्धा गहू, हरभऱ्याचे सर्वाधिक ७१ हजार ८०० हेक्टर पेरणी क्षेत्र असून, इतर रब्बी पिकांची केवळ ६४० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
हे ही वाचा : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा ; नगरसेवकांची धक्काबुक्की, अधिकाऱ्यांचे बहिर्गमण
गेल्या चार ते पाच वर्षापासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, कीडी, रोगांचा प्रादुर्भाव, तण इत्यादी नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांना हतबल करून सोडले आहे. शासनाकडून शेतमालाची योग्यवेळेत व योग्यप्रमाणात हमीभावाने खरेदी केली जात नाही. व्यापारी वर्ग त्याचा फायदा उचलत कवडीमोल दराने शेतकऱ्यांचा शेतमाल घेतात. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालवत गेली आहे. बँकांकडून सुद्धा पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे शेतकऱ्याला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आता इतर व्यवसाय, कामधंद्यांकडे वळावे लागत आहे. त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी मुबलक पाणी असतानाही अकोला जिल्ह्यात केवळ ६७ टक्के रब्बी पेरणी झाली आहे.
हे ही वाचा : शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली जलसंपदा मंत्री, पालकमंत्र्यांची भेट
कीड, विषाणू, वातावरण बदलाचा मोठा फटका
वातावरणात दिवसेंदिवस अनपेक्षित बदल घडून येत असून, त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी, मका, गहू, कापूस, हरभरा, भाजीपाला पिके व फळपिकांवरही गेल्या काही वर्षात कीडींचा, विषाणूजन्य आजारांचा प्रादूर्भाव वाढला आहे. याचा मोठा आर्थिक फटका कृषी क्षेत्राला पर्यायाने, शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी विमा कंपन्यांनी घेऊन शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
भरवसा हरवला !
विमा, पीककर्ज मिळेना, सरकार हमीभावात शेतमाल खरेदी करेना, कृषी निविष्ठा महागल्या, व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने शेतमालाची खरेदी, निसर्गाची अवकृपा, इत्यादी कारणांनी शेतकरी आता हतबल झाला असून, शेतीपेक्षा नोकरी व इतर व्यवसायावर भर देऊ लागला आहे. शेतकऱ्यांना परत शेतीवरचा विश्वास दृढ करून द्यायचा असेल तर, शासनाला पुढाकार घ्यावा लागणार असून, शेतीतून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावे लागेल.
सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची
कृषी विभागाच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात एक लाख सात हजार ९७६ हेक्टर रब्बी लागवडीसाठीचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी सर्वाधिक ६१ हजार ३०८ हेक्टरवर हरभरा, दहा हजार ४९२ हेक्टरवर गहू, ४५३ हेक्टरवर रब्बी ज्वारी, ८९ हेक्टरवर करडई, ९४ हेक्टरवर मका व चार हेक्टरवर जवस लागवड झाली आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले