Akola : आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यास प्रतिबंध; जिल्हाधिकारी निमा अरोरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akoha : आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यास प्रतिबंध; जिल्हाधिकारी निमा अरोरा

Akola : आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यास प्रतिबंध; जिल्हाधिकारी निमा अरोरा

अकोला : संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच जातिय सलोखा कायम रहावा यासाठी सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व प्रक्षोभक पोस्ट प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.उपविभागीय दंडाधिकारी,अकोला यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी संपूर्ण अकोला शहरासाठी फोजदारी प्रक्रिया सहित १९७३ चे कलम १४४ अंतर्गत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. भविष्यामध्ये देखील जिल्ह्यात सामाजिक व जातिय सलोखा कायम राहण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार, भारतीय दंड संहितेचे कलम ५०३, १५३ (अ) व ११६ अन्वये संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये सोशल मिडीयावरुन आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.

काय आहे आदेशात

  1. कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरुन निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट, अगर जाती, अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेषाच्या भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा वा अनधिकृत माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर दंडनिय कारवाईस पात्र राहील.

  2. निरनिराळे धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट, अगर जाती, अगर जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक आणि ज्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडते किंवा बिघडणे संभाव्य असते अशा पोस्ट सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर कारवाईस पात्र राहील.

  3. एखादी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव, अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखाद्या भागामध्ये भीती किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होईल किंवा त्यामुळे तसे होण्याची शक्यता असेल किंवा एखाद्या समुहातील व्यक्तींना दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समुहाविरुद्ध कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश्य असेल किंवा चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल अशा पोस्ट सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर कारवाईस पात्र राहील.

  4. सोशल मिडीयावर जो कोणी व्यक्ती संस्था, संघटना हा ऍडमिन म्हणून कार्यरत असेल त्यांनी त्यांचे गृपवर कोणत्याही प्रकारच्याद्य प्रक्षोभक पोस्ट प्रसारित होणार नाहीत, या बाबत काळजी घ्यावी. अन्यथा सदर ऍडमिन नियमानुसार कारवाईस प्राप्त राहील. त्याच प्रमाणे, या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधांची किंवा काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. हे आदेश अकोला जिल्ह्यातील शहरी तसेच प्रामीण भागाकरिता पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

loading image
go to top