एकीकडे योजना गुंडाळण्याची तयारी; दुसरीकडे लाभासाठी लाभार्थ्यांची धावाधाव

सुगत खाडे  
Tuesday, 25 August 2020

ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कायमस्वरुपी स्वयंराेजगाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे गत आर्थिक वर्षात राबविलेली दुर्धपूर्णा याेजना या आर्थिक वर्षात गुंडाळण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे.

अकाेला  : ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कायमस्वरुपी स्वयंराेजगाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे गत आर्थिक वर्षात राबविलेली दुर्धपूर्णा याेजना या आर्थिक वर्षात गुंडाळण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे.

दुसरीकडे लाभापासून वंचित असलेले लाभार्थी जिल्हा परिषदेत धाव घेत लाभ देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे वंचितांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी गरीब लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ग्रामीण भागातील लाभार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत व त्यांना स्वयंराेजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत गत आर्थिक वर्षी २०१९-२० मध्ये दुधपूर्णा याेजना राबविण्यात आली. याेजनेसाठी ५ काेटीची तरतूद सुद्धा केली होती. याेजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या पात्र ६६४ अर्जांपैकी ५२१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. लाभार्थ्यांना प्रथम एक व नंतर दुसऱ्या दुधाळ जनावराचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

परंतु गत आर्थिक वर्षात ते शक्य न झाल्याने दुसऱ्या लाभापासून वंचित लाभार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही. या स्थितीत समाज कल्याण समिती जुन्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यास निरुत्साही असल्याने अनेक लाभार्थी दुसऱ्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

केवळ २६ लाभार्थ्यांनाच मिळाला दुहेरी लाभ
दुधपूर्णा योजनेअंतर्गत ५२१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४१७ लाभार्थ्यांनी एक दुधाळ जनावर विकत घेतले व केवळ २६ लाभार्थ्यांना दुसऱ्या दुधाळ जनावरांचा लाभ मिळाला. ३९१ लाभार्थी दुसऱ्या लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. सदर लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी समाज कल्याणला १ कोटी ६७ लाख रुपये लागतील, तर योजनेवर याआर्थिक वर्षासाठी ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. असे असल्यानंतर सुद्धा योजना गुंडाळण्याची तयारी करण्यात येत असल्याचे त्यापासून कोणाचे कल्याण होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लाभार्थ्यांची जिल्हा परिषदेत धाव
दुधाळ जनावराच्या लाभापासून वंचित असलेल्या बार्शीटाकळीत तालुक्यातील १५ पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी सोमवारी (ता. २४) जिल्हा परिषदेत धाव घेतली. सदर लाभार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देवून दुसऱ्या जनावरांचा लाभ द्यावा, अशी मागणी केली. निवेदन देते वेळी सोनाजी शिंदे, राहुल ठिसाडे, राजू बोबडे, राणी लांडगे, जग्गनाथ वानखडे व इतर उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beneficiaries rush for Akola Zilla Parishad scheme​