Bharat Jodo Yatra : जुनी पेन्शन योजना, दिव्यांगांनी वेधले पदयात्रेचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : जुनी पेन्शन योजना, दिव्यांगांनी वेधले पदयात्रेचे लक्ष

अकोला : खासदार राहुल गांधी यांचे नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेला जिल्ह्यात पातुर येथून गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. पदयात्रेची सुरुवातच धक्काबुक्कीने झाल्याने पदाधिकाऱ्यांची पोलिस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत ही झाली. पदयात्रेदरम्यान जुनी पेन्शन योजना आणि दिव्यांगांसह विविध संघटनांच्या मागण्यांनी लक्ष वेधले.

पातूर येथील शहाबाबू विद्यालयातून पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी पदयात्रेत सहभागी झालेल्या माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांना काही जणांची धक्काबुक्की झाली. त्यामुळे त्या किरकोळ जखमी झाल्या. पोलिसांचे नियोजन योग्य होत नसल्याबद्दल त्यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासोबत या विषयावरून यशोमती ठाकूर यांचा वादही झाला. पातुरपासून निघालेल्या पदयात्रेत पहिल्या तीन किलोमीटर पर्यंत नागरिकांनी राहुल गांधी यांना बघण्यासाठी एकच गर्दी केल्याने सुरक्षारक्षकांचा ताण चांगलाच वाढला होता. त्यातून अनेकांना सुरक्षारक्षकांकडून बळजबरीने बाहेर काढण्यात आले.

त्याचा फटका दर्यापूर येथील काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांनाही बसला. त्यांना सुरक्षा कड्यातून बाहेर काढण्यात आले. पुढे काही अंतरापर्यंत नागरिक व सुरक्षा रक्षकांमधील लोटालोटी सुरूच होती. पदयात्रेदरम्यान विविध संघटना त्यांच्या मागण्यांसाठी खासदार राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सहभागी झाल्या होत्या.

बाबुळगावच्या पुढे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून पदयात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी माजी मंत्री जयराम रमेश यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही काँग्रेसची भूमिका असून, राज्यात काँग्रेसची सत्ता येताच जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे आश्वासन समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे विविध जिल्ह्यातून आलेल्या पेन्शन हक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्यांचे आभारही मानले. याशिवाय काही ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासह विविध मागण्यांचे फ्लेक्स पदयात्रेच्या मार्गावर झळकविण्यात आले होते.

दिव्यांगजन राहुल गांधींच्या भेटीसाठी

वाडेगाव येथे बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअरहाऊस मध्ये खासदार राहुल गांधी व पदयात्रेत सहभागी झालेले नेते यांचा दुपारचा मुक्काम होता. या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील दिव्यांग जणांच्या संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आले होते. राहुल गांधी यांची भेट व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही.

वाडेगावमध्ये उत्स्फूर्त स्वागत

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रा वाडेगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे तेथे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. धनेगाव फाटा येथे पदयात्रा विसावली. यादरम्यान विविध ठिकाणी स्वागतासाठी उभे असलेल्या पदाधिकाऱ्यांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. वाडेगाव ते बाळापुर दरम्यान पदयात्रेत सहभागी झालेल्या युतींनी व महिलांनी सर्व धर्मीय चिन्ह घेऊन एकतेचा संदेश दिला.