esakal | भाजपचं मिशन लोकसभा? सेनेला शह देण्यासाठी रणनिती आखल्याची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

BJP and Shivsena

भाजपचं मिशन लोकसभा? सेनेला शह देण्यासाठी रणनिती आखल्याची चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशिम : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात राजकीय भूकंपाचे (Shivsena bjp dispute washim) हादरे सुरू आहेत. खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) विरूध्द भाजप असा, सामना रंगत असतानाही येणाऱ्या लोकसभेची रंगीत तालीम असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. भाजपला वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ (washim yavatmal loksabha constituency) सर करण्यासाठी आतापासूनच आक्रमक रणनिती आखली जात असल्याचीही चर्चा असल्याने हा सामना आणखी जोरदार रंगणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

वाशिम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्यापासून तो शिवसेनेचा गड राहिला आहे. त्याआधी वाशीम लोकसभा अस्तित्वात असताना शिवसेनेने या मतदारसंघावर पकड निर्माण केलेलीच होती. खासदार भावना गवळी या पाचव्यांदा शिवसेनेच्या खासदार आहेत. तत्पूर्वी त्यांचे वडील पुंडलीकराव गवळी यांनी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पराभव करून हा मतदारसंघ शिवसेनेच्या खाती जमा केला होता. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती कायम राहत असल्याने एक अपवाद वगळता भाजपला या मतदारसंघात संधी मिळाली नाही. आता युतीही नाही आणि सख्यही नाही. या परिस्थितीत भाजपने शिवसेनेला लक्ष करण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खासदार भावना गवळी यांच्यावर मुंबईवरून येऊन किरिट सोमय्या यांनी केलेले आरोप तसेच, त्यानंतर कोणतीही नोटीस न देता खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर केंद्रीय सक्तवसूली संचालनालयाचे पडलेले छापे हा घटनाक्रम भाजपकडे अंगुलीनिर्देश करण्यास पुरेसा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. केंद्रीय पातळीवर वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याची रणनिती तयार करण्यात आल्याचीही चर्चा आहे.

भाजपची पाटणीवर मदार -

वाशिम- यवतमाळ मतदारसंघ शिवसेनेकडून खेचून घेण्यासाठी स्वतंत्र्य कोअर टिम बनविली गेली आहे. भाजपकडून वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात कारंजाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी हे संभाव्य उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे. यासाठीच भाजप सध्या आक्रमक धोरणावर काम करीत आहे. दुसरीकडे या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकल्यास माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या मुलाचा दावा राहण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडी निवडणुकीपर्यंत गेल्यास हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार, अशी शक्यता भाजपच्याच गोटातून व्यक्त होत असल्याने कोणतीही रिक्स नको, असा निरोप केंद्रीय नेतृत्वाकडून मिळाल्याने जिल्ह्यात सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

जनाधार शिवसेनेचा आधार -

या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक दिग्गज मैदानात उतरविले होते. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक, माणिकराव ठाकरे, अनंतराव देशमुख, शिवाजीराव मोघे यांना पराभूत व्हावे लागले. प्रत्येक निवडणुकीत भावना गवळी यांचे मताधिक्य वाढते राहिले आहे. या परिस्थितीत भाजपला हा मतदारसंघ काबीज करण्यात अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे.

loading image
go to top