348 मंदिरात आज घंटानाद, धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी भाजपचे जिल्हाभर आंदोलन

विवेक मेतकर
Saturday, 29 August 2020

धार्मिक स्थळे बंद असल्याने या परिसरातील छोटे-मोठे व्यवसाय करणारे आर्थिक अडचणीत सापडले आहे. राज्यात दारूची दुकाने सुरू आहेत, परंतु धार्मिक स्थळांवर दर्शन करण्याची मनाई आहे. दर्शन घेतल्याने कोविड-१९ चा संसर्ग वाढणार असा अजब तर्क लावल्या जात आहे.

अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ च्या संसर्गामुळे राज्यातील धार्मिक स्थळे २२ मार्चपासून बंद आहेत. त्यानंतर ६ जून रोजी धार्मिक स्थळे सुरू करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून व दर्शना, प्रार्थनेसाठी धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने अकोला जिल्ह्यातील ३४८ मंदिरांमध्ये शनिवारी घंटानात आंदोलन करण्यात येणार आहे.

धार्मिक स्थळे बंद असल्याने या परिसरातील छोटे-मोठे व्यवसाय करणारे आर्थिक अडचणीत सापडले आहे. राज्यात दारूची दुकाने सुरू आहेत, परंतु धार्मिक स्थळांवर दर्शन करण्याची मनाई आहे. दर्शन घेतल्याने कोविड-१९ चा संसर्ग वाढणार असा अजब तर्क लावल्या जात आहे.

या निर्णायाविरुद्ध भाजपच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करणार आहे. अकोला जिल्हा भाजपने ३४८ ठिकाणी घंटानाद आंदोलन करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली आहे.
 
अकोला शहरातील ४८ मंदिरात आंदोलन
अकोला शहरातील प्रमुख ४८ मंदिरात आमदार रणधीर सावरकर, आमदा गोवर्धन शर्मा, विजय अग्रवाल, महापौर अर्चनाताई मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी व नगरसेवकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातही प्रत्येक तालुक्यातील प्रमुख व प्रसिद्ध मंदिरांमध्ये स्थानिक नेत्यांच्या उपस्थित आंदोलन केले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs district-wide agitation to start religious places at Akola News 348 temple today