प्लाझ्मा डोनेटमध्ये काळ्याबाजाराची शक्यता, आता डोनरवर अन्न व औषध विभागाचे लक्ष

भगवान वानखेडे
Saturday, 25 July 2020

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी ठरत आहे. यासाठी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन सतत केले जात आहे. मात्र, प्लाझ्मा डोनेटमध्ये काळाबाजार होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे प्लाझ्मा डोनरवर अन्न व औषध विभागाचे लक्ष असणार असून, यामध्ये अनुचित प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.

अकोला  ः कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी ठरत आहे. यासाठी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन सतत केले जात आहे. मात्र, प्लाझ्मा डोनेटमध्ये काळाबाजार होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे प्लाझ्मा डोनरवर अन्न व औषध विभागाचे लक्ष असणार असून, यामध्ये अनुचित प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.

खासगी रक्तपेढ्यांना व्यावसायिक दाता निवडणे किंवा पैसे देऊन दात्याकडून रक्त घेणे अथवा रक्त घेऊन रक्तघटक तयार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर अकोल्यातील खासगी आठ आणि शासकीय एका रक्तपेढीपैकी केवळ सर्वोपचारमधील शासकीय रक्तपेढीलाच रक्तदात्याची आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे पडताळून आणि आवश्‍यक त्या सर्व चाचण्या करून दात्याच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तर यावर लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध विभागाला अधिकार देण्यात आले असून, अन्न व औषध विभाग या शासकीय रक्तपेढीची कधीही तपासणी करू शकते. यामध्ये काही अनुचित प्रकार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे.

काळ्या बाजाराची अशी आहे शक्‍यता
सध्या अकोल्यातील खासगी रक्तपेढ्यांना डोनरकडून प्लाझ्मा देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ही परवानगी केवळ शासकीय रक्तपेढीलाच आहे. मात्र, मोठ्या महानगरातील शासकीय सोबतच खासगी रक्तपेढ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तेव्हा रक्तपेढ्या डोनरकडून प्लाझ्मा घेऊन त्या बाधितांना जास्त पैशात विकू शकतात. असा प्रकार मोठ्या महानगरात सुरू आहे. या काळाबाजाराची अकोल्यातही भीती असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हे नियम पाळावे लागणारच
पात्र रक्तदात्याकडून रक्त घटक घेतल्यानंतर त्याच्या आवश्‍यक त्या सर्व चाचण्या करणे, त्याची नोंद ठेवणे आणि योग्य तापमानामध्ये त्याची साठवणूक करणे बंधनकारक आहे. कोरोना रुग्णाला रक्त घटक देण्यापूर्वी डॉक्‍टरांचे मागणीपत्र आणि आवश्‍यक ती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. रुग्णालयांनी रक्त घटकाची मागणी करण्यापूर्वी आलेल्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेणे व त्याची चौकशी करावी लागणार आहे.

प्लाझ्मा डोनरवर अन्न व औषध विभागाचे लक्ष आहे. कुणीही गैरप्रकाराला बळी पडू नये, डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय कोणाकडूनही प्लाझ्मा घेऊन नये, भूलथापांना बळी पडू नये.
-हेमंत मेटकर, सहाय्यक आयुक्त, औषधी विभाग, अकोला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black market prospects in Akola plasma donuts, now Food and Drug Administration's focus on donors