esakal | आईचा एकच टाहो! माझ्या मुलाचा मृतदेह मला आणून द्या
sakal

बोलून बातमी शोधा

आईचा एकच टाहो! माझ्या मुलाचा मृतदेह मला आणून द्या

आईचा एकच टाहो! माझ्या मुलाचा मृतदेह मला आणून द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : माझ्या मुलाचा मृतदेह मला बघू द्या, त्यांचे अंतिम दर्शन तरी घेऊ द्या, असा टाहो उरळ पोलिसांच्या हद्दीतून मृतदेह वाहून गेलेल्या दर्शन शुक्लाची आई राधा सचिन शुल्का यांनी फोडला. कुटुंबीयांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला असून, दोषींवर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे.

शेलार फैल येथील अठरा वर्षीय दर्शन शुक्ला मित्रांसह गांधीग्राम वाघोली येथे २९ ऑगस्ट रोजी काही मित्रांसोबत कावडसोबत गेला होता. मात्र, तो रात्री घरी परत न आल्यामुळे घरच्यांनी मित्रांकडे चौकशी केली. दर्शनच्या मित्रांनी तो आमच्या सोबत नव्हता असे सांगितले. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी ३० ऑगस्ट रोजी रामदासपेठ पोलिस स्टेशनला मुलगा हरविल्याची तक्रारी दिली.

हेही वाचा: पावसाचा कहर! विदर्भातील चार युवक गेले वाहून

१ सप्टेंबरच्या रात्री ८.३० वाजता एका शेतात नदी काठावर मृतदेह आढळला. तेथील पोलिस पाटलांनी मृतदेहाचा फोटो दर्शन शुक्लाच्या घरच्यांना पाठवला. मृतदेह हा दर्शनच असल्याचे समजले. मात्र, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृतदेह पुन्हा नदीत वाहून गेल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. १ सप्टेंबरला बोरगाव वैराळे येथे दर्शन शुक्ला याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली होती. मात्र, नातेवाईक येथे पोहोचेपर्यंत मृतदेह पुन्हा नदीच्या पाण्यात वाहून गेला असे उरळ पोलिसांनी सांगितले.

उरळ पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडला असून, संबंधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. या संदर्भात शुक्ला कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षक श्रीधर यांना भेटून चौकशी करण्याची मागणी केली आहे. दर्शनच्या आईने एकुलत्या एक मुलाचे पोलिसांनी दर्शन करून द्यावे, अशी मागणी करीत आर्त टाहो फोडत आपबीती कथन केली.

loading image
go to top