esakal | पावसाचा कहर! विदर्भातील चार युवक गेले वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा कहर! विदर्भातील चार युवक गेले वाहून

पावसाचा कहर! विदर्भातील चार युवक गेले वाहून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि. बुलडाणा) : जिल्‍ह्यात सोमवारी (ता. ६) सायंकाळपासून वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलाच जोर धरला आहे. धो-धो पाऊस पडल्याने शेगाव तालुक्यातील नदी- नाल्यांना पूर आला आहे. जवळा पळसखेड येथे शेतनाल्यावर आंघोळीसाठी गेलेला १८ वर्षीय युवक वाहून गेल्याची घटना मंगळवारी (ता. ७) घडली.

प्राप्‍त माहितीनुसार, बाळापूर रोडवर असलेल्या जवळा पळसखेड येथील १८ वर्षीय युवक आदित्य संतोष गवई हा मित्रांसोबत गावातील शेत नाल्याला पूर आल्याने नदीमध्ये आंघोळीसाठी गेला. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला. यावेळी मित्रांनी शोधाशोध केली परंतु, तो दिसून आला नाही. या घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलिसांना कळताच पोलिस कॉन्स्टेबल अरुण मेटांगे, प्रवीण ईतवारे हे घटनास्‍थळी दाखल झाले. वाहून गेलेल्‍या युवकाचा अद्यापही शोध लागला नसून गावकऱ्यांच्‍या मदतीने शोध कार्य सुरू आहे.

हेही वाचा: नागपूर : कोरोनाची तिसरी लाट?, वीकएंड लॉकडाऊनची घोषणा

पुरातून दुचाकी काढणे भोवले, दोन तरुण गेले वाहून

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील वसंतनगर येथील काळी(दौ)कडे जाणाऱ्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याच्या नादात दोन युवक वाहून गेले. ही घटना सोमवारी रात्री ७ वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे या तरुणांनी दुचाकी पुराच्या पाण्यातून नेण्याचा नाद चांगलाच भोवला. ज्ञानेश्वर जाधव (वय २८), सुरेश महिंद्रे (वय २७) असे वाहून गेलेल्या युवकांचे नाव आहेत. ते महागाव तालुक्यातील साई ईजारा गावचे रहिवासी आहेत.

पुराच्या पाण्यात वाहल्याने युवकाचा मृत्यू

वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मोहगव्हाण येथील गणेश कान्हेरे (वय ३२) हा युवक सकाळी ७ वाजता गावाशेजारील तलावातील सांडव्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. अचानक पाण्याचा जोर वाढल्याने तो वाहून गेला. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच शोध घेतला असता मृतदेह आढळून आला. तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे झोडगा ते मोहगव्हाण रस्त्यावर असणाऱ्या कमी उंचीच्या पुलावर चार ते पाच फूट पाणी असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यास अडचणी येत आहेत.

हेही वाचा: रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

झोडगा ते मोहगव्हाण या रस्त्यावरील पुलाची उंची कमी आहे. यामुळे पावसाळ्यात वारंवार गावांचा संपर्क तुटतो. मोहगव्हाण गावाजवळ गावतलाव आहे. पावसामुळे हा तलाव पूर्ण भरला आहे. मोहगव्हाण येथील युवक या तलावाच्या सांडव्यावर मासोळी पकडण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने सांडव्यातून गणेशचा तोल जाऊन नदीत वाहून गेला. ग्रामस्थांनी तत्काळ शोधाशोध केली, मात्र नदीत काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने मोहगव्हाण गावात शोककळा पसरली आहे.

loading image
go to top