बीटीचे बियाणेही अप्रमाणित; कंपनीवर कोर्ट केस दाखल, सोयाबीन पाठोपाठ बीटी कपाशीच्या बियाण्यांवर, अप्रमाणिकतेचा ठपका

सुगत खाडे  
Tuesday, 11 August 2020

नमूने प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळल्यामुळे कंपनीविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सदर कारवाईमुळे बियाणे कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अकोला  ः वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी बीटी कपाशीचे अप्रमाणित बियाणे मारणाऱ्या बायर बायो-सायंस या कंपनीविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. कृषी विभागाने सदर कंपनीच्या बीटी कपाशी वाणाचे दोन नमूने तपासणीसाठी घेतले होते.

सदर नमूने प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळल्यामुळे कंपनीविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सदर कारवाईमुळे बियाणे कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यावर्षी खरीप हंगात शेतकऱ्यांनी मोठी उमेद ठेवून यावर्षी सोयाबीनसह कपाशीचे बियाणे पेरले. पेरण्या आटोपल्यानंतर पाऊस सुद्धा चांगला झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु शेतकऱ्यांनी पेरलेल्या बीटी कपाशीवर आता बोंडअळीने हैदोस घातला आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आता वांझोट्या सोयाबीन बियाण्यांपाठोपाठ अप्रमाणित बीटी कपाशी बियाण्यांच्या दुष्टचक्रात सापडला आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अप्रमाणित बीटी बियाणे प्रकरणी बायर बायो-सायंस या कंपनीविरोधात खटले दाखल केले आहेत. सदर कंपनीच्या बीटी कापूस बियाण्यांचे दोन नमूने अप्रमाणित आढळल्याने कृषी विभागाने ही करवाई केली.

मे महिन्यात घेतले होते नमूने
जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी मिलींद जंजाळ यांनी मे महिन्यात बायर बायो-सायंस या कंपनीच्या अकोट रोड वरील गोदामातून बीटी कपाशीच्या वाणाचे दोन नमुने घेतले होते. सदर बियाण्यांमध्ये एक जनुक (जीण) जास्त आढळल्याचा ठपका प्रयोगशाळेने ठेवला आहे. त्यावर कंपनीने खुलासा सादर केल्यानंतर तो असमाधानकारक असल्याने कृषी विभागाने कंपनीविरोधाक न्यायालयात खटले दाखल केले आहे.

अप्रमाणित सोयाबीन प्रकरणीही ‘कोर्ट केस’
अप्रमाणित सोयाबीन बियाणे प्रकरणी तेल्हारा न्यायालयात बुस्टर प्लॅंट जेनेटीक कंपनीविरोधात कोर्ट केस (खटले) दाखल करण्यात आली आहे. सदर कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमतेत फेल (अप्रमाणित) आढळल्याने संबंधित कंपन्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी मूर्तिजापूर तालुक्यात मे. सारस ॲग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अग्रो सर्विसेस या दोन कंपन्यांवर कोर्ट केस दाखल करण्यात आली होती. त्यासह बार्शीटाकळी न्यायालयात सोयाबीनचे अप्रमाणित बियाणे प्रकरणी वरदान बायोटेक, केडीएम सिड्स व महाबीज विरोधात सुद्धा कोर्ट केस दाखल करण्यात आली आहे.
 
बायर बायो-सायंस या कंपनीचे बीटी कपाशी बियाणे प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळले आहेत. संबंधित बियाण्यांमध्ये बीटी जनुक जास्त आढळला. त्यामुळे कंपनीविरोधात अकोला न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. यासह तेल्हारा न्यायालयात अप्रमाणित सोयाबीन बियाणे प्रकरणी बुस्टर प्लॅंट जेनेटीक विरोधात सुद्धा खटले दाखल करण्यात आले आहेत.
मिलींद जंजाळ, मोहीम अधिकारी (कृषी विभाग)
जिल्हा परिषद, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bt seeds in Akola are also uncertified; Court case filed against company, Bt cotton seeds after soybean, accusation of dishonesty