बुलडाणा : रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा सलाईनवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

बुलडाणा : रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा सलाईनवर

नांदुरा (जि. बुलडाणा) : कोरोना योद्ध्यांची प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नांदुरा तालुक्यातील आरोग्य सेवेला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून, वेळेवर सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यात आरोग्य विभागासाठी सर्व प्रकारची १०८ पदे मंजूर असली तरी त्यातील फक्त ६९ पदे भरलेली असून, ३९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची कार्यवाही होतच नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असून, हा विभाग सध्या कसातरी सलाईन वर सुरू आहे.

नांदुरा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र व १९ उपकेंद्राच्या माध्यमातून ११२ गावातील जवळपास १ लाख २० हजार पेक्षा जास्त व शहरातील ५० हजार पेक्षा अधिक अशा दीड ते पावणेदोन लाख लोकांच्या आरोग्याचा गाडा संबंधित विभागाकडून हाकला जात असतांना नेहमीच येथे रिक्त पदाच्या ग्रहणातून जनतेला खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागत आहे.

रिक्त पदांचा विचार करता सध्या तालुक्यात महत्वाची समजली जाणारी वैद्यकीय अधिकारी गट अ च्या मंजूर आठ पदापैकी प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर येथील एक पद रिक्त असून वैद्यकीय अधिकारी गट ब मंजूर ८ पदांपैकी ५ पदे भरण्यात आली असली तरी निमगाव, जिगाव व नायगाव येथील प्रत्येकी एक अशी ३ पदे रिक्त आहेत. सोबतच औषध निर्माण अधिकारी यांची तालुक्यात मंजूर ४ पदांपैकी २ पदे भरण्यात आली असून, टाकरखेड व नांदुरा येथील प्रत्येकी एक अशी दोन पदे रिक्त आहेत.

हेही वाचा: मालेगावात का उसळला हिंसाचार? जाणून घ्या बांगलादेश कनेक्शन

आरोग्य सेवकांची २२ मंजूर पदे असतांना प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा, दहिगाव, दादगाव, विटाळी, तरवाडी व उपकेंद्र शेंबा बु येथील प्रत्येकी १ अशी एकूण ६, आरोग्य सेविका मंजूर २४ पदांपैकी उपकेंद्र वडनेर येथील २, टाकळी वतपाळ, विटाळी, डिघी, टाकरखेड, रसुलपूर, प्रा. आ. केंद्र शेंबा बु येथील प्रत्येकी १ अशी एकूण नऊ पदे, आरोग्य सहाय्यीका मंजूर पदे ४ पदापैकी प्रा. आ. केंद्र वडनेर येथील एक पद, परिचारक पुरुष मंजूर १३ पदापैकी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय १, प्रा. आ. केंद्र नांदुरा ३, वडनेर ३, टाकरखेड २, शेंबा २ अशी ११ पदे, परिचारक स्त्री मंजूर पदे ४ त्यापैकी फक्त एक पद भरण्यात आले असून टाकरखेड, शेंबा व वडनेर येथील प्रत्येकी एक अशी तीन पदे रिक्त आहेत.

तर वाहनचालक एकूण मंजूर ४ पदापैकी चारही प्राथमिक आरोग्य केंद्राची पदे रिक्त तर सफाई कामगार मंजूर ४ पैकी चारही पदे रिक्त असल्याने एकूण सर्व प्रकारच्या मंजूर १०८ पदापैकी ६९ जागा भरलेल्या असल्या तरी ३९ जागा रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.

रेफर टू खामगावचे प्रमाण वाढले

नांदुरा तालुक्‍यातील अनेक खेडेगावात डॉक्‍टरांच्‍या अपुऱ्या संख्येमुळे ग्रामस्‍थ थेट नांदुरा शहर गाठतात. परंतु, येथील आरोग्‍य केंद्रात देखील तीच परिस्‍थिती असून, अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे व सोयी सुविधांच्‍या अभावामुळे रुग्‍णांना थेट खामगाव रेफर करण्यात येते. त्‍यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणीचा सामना तर करावाच लागतो. तसेच आर्थिक झळ पोहचते.

loading image
go to top