बुलडाणा : शेगावात पालिका निवडणुकीची पूर्व तयारी जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Election

बुलडाणा : शेगावात पालिका निवडणुकीची पूर्व तयारी जोरात

शेगाव (जि. बुलडाणा) : आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्वतयारी सुरू केली असून, निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रभागातील मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. प्रभागातील सर्वच कार्यक्रमांना इच्छुक उमेदवार उपस्थित राहून निवडणुकीचे नियोजन करीत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी स्वतः विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास प्रारंभ केला आहे.

नगरपालिकेची निवडणूक भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची तर काँग्रेसच्या दृष्टीने अस्तित्वाची ठरणार आहे. २०१६ मध्ये झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराने बाजी मारली होती. तर प्रभागांमध्येही सर्वाधिक जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसला केवळ एका जागेवर यश प्राप्त झाले होते.

आगामी पालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता असून, राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी पक्षांतर करण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी पूर्वतयारी सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वतः ची भावी नगरसेवक म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिध्दी सुरू केल्यामुळे मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. खाजगी कार्यक्रमात भावी नगरसेवक असा उल्लेख करण्याच्या सूचना इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांना करीत असून तसा संदेश समाज माध्यमांमधून व्हायरल करीत आहेत.

हेही वाचा: "मूठभर लोकं देशभक्त मुसलमानांना बदनाम करताय"

आघाडी होणार की स्वतंत्र लढणार ?

पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षांत कधीही सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहत नसलेले इच्छुक उमेदवार सर्वच कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमधून उपहासात्मक टिंगल केली जात आहे. कांग्रेस, भाजप आणि या प्रमुख पक्षांनी पालिका निवडणुकीची पूर्वतयारी वेगाने सुरू केली आहे. राज्यात कांग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत असल्यामुळे पालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतात की स्वतंत्र लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व जागांवर निवडणूक लढविष्याबाबत नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. पालिका निवडणुकीत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. काही राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी निवडणूक लढविण्याचे नियोजन केले आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सर्वच प्रभावी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

loading image
go to top