esakal | बुलडाणा : बापाचा खून करणाऱ्या मुलीस न्यायालयीन कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

कोठडी

बुलडाणा : बापाचा खून करणाऱ्या मुलीस न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि. बुलडाणा) : शहरातील मुक्ताईनगर रोडवरील सुभाषचंद्र बोस नगरमध्ये गृहकलहातून पोटच्या मुलीने चुलत भावाच्या मदतीने जन्मदात्या बापाचा निर्घृण खून केल्याची घटना (ता.८) रात्री घडली होती. याबाबतची तक्रार मृताच्या दुसऱ्या मुलीने शहर पोलिसांत दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली होती. दरम्यान, गुरुवारी दोन्ही आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मुलीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर तिच्या चुलत भावाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहरातील सुभाषचंद्र बोस नगरातील गुलाब यादवराव रावनचवरे यांच्या लक्ष्‍मी नामक मुलीचे तीन वेळा लग्न झाले आहे. परंतु तिचे सासरी पटत नसल्याने ती माहेरीच राहत होती. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मी सासरी जाणार नसून माहेरीच राहणार असल्याचे तिने वडील गुलाब रावणचवरे यांना सांगितले. त्यावर तिच्या वडीलांनी आमची बदनामी होईल.

हेही वाचा: शिक्षण सभापतींचे अध्यक्षांना आव्हान! वाद चव्हाट्यावर

अजून तुझ्या दोन्ही बहिणींचे लग्न राहिले आहे. त्यामुळे तू इथे न राहता सासरी रहा नाही तर कोठेही रहा, असे सांगितले. मात्र, तिने मी इथेच राहणार असे म्हणून वडिलांशी वाद घातला.

त्यानंतर लक्ष्मी व तिच्या सोबत आलेला चुलत भाऊ प्रकाश साहेबराव रावणचवरे या दोघांनी वडिलांच्या छातीवर धारदार चाकूने सपासप वार करुन त्यांना ठार मारले. अशी तक्रार वैष्णवी गुलाब रावणचवरे हिने पोलिसांत दिली. यावरुन ठाणेदार प्रल्हाद काटकर, एपीआय सुखदेव भोरकडे, पोलिस उपनिरिक्षक विश्वजीत ठाकूर, रतनसिंह बोराडे हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्याच रात्री दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ९ सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने लक्ष्मीला चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तिची रवानगी बुलडाणा जिल्हा कारागृहात केली आहे.

loading image
go to top